सोनई: प्रेमीयुगुलांसाठीचे आडोसे हटविले
सोनई, पुढारी वृत्तसेवा: सोनई- राहुरी रस्त्यावरील कॅफेमध्ये नव्याने तयार झालेल्या प्रेमीयुगुलांसाठी बसण्यासाठी तयार झालेले आडोसे सरपंच धनंजय वाघ व ग्रामपंचायत यंत्रणेने कारवाई करीत काढले.
सोनई-राहुरी रस्त्यावर प्रेमीयुगुलांसाठी एकांतात बसण्यासाठी कॅफे चालकांनी लाकडाचे कंपार्टमेंट व कापडी पडदे लावून आडोसे तयार केले असल्याची माहिती सोनईचे सहायक पोलिस निरीक्षक माणिक चौधरी यांना मिळाल्याने त्यांनी कॅफेवर अचानक भेट दिली असता, तेथे प्रेमीयुगुलांना बसण्यासाठी कंपार्टमेंट तयार करून पडदे लावलेले दिसून आले. हे पडदे तत्काळ काढून ग्राहकांना बैठक व्यवस्था दिसेल अशी करण्याची सूचना करीत कारवाई केली होती.
दोन दिवसानंतर सरपंच धनंजय वाघ यांनी या कॅफेला भेट दिली असता, तेथील परिस्थिती 'जैसे थे' असल्याचे पाहून ग्रामपंचायत कर्मचार्यांनी या आडोशांचे पडदे व काही लाकडी फळ्या काढून कंपार्टमेंट पारदर्शी करून कॅफेधारकाला सक्त ताकीद दिली.

