

भाळवणी : येथील विजयगंगा नर्सिंग कॉलेजची विद्यार्थिनी विशाखा गुणवंत रणित हिची शाळेच्या मूळ कागदपत्रांची बॅग भाळवणीच्या कापरी चौकात आढळली. सजग कार्यकर्त्यांमुळे बॅग विद्यार्थिनीला परत मिळाली. डॉ. तनुजा व डॉ. किरण रोहोकले यांच्या विजयगंगा नर्सिंग कॉलेजची बुलढाण्याची विद्यार्थिनी विशाखा रणित सोमवारी (दि. 20) भाळवणी येथून गावी निघाली. तिची दहावी, बारावीची मूळ कागदपत्रे असलेली बॅग भाळवणीच्या कापरी चौकात पडली.
या दरम्यान काँग्रेसचे उपाध्यक्ष सीताराम देठे, पिंपळगाव तुर्कचे सरपंच धोंडीभाऊ वाळुंज व विश्वकर्मा संस्थान पिंपळनेरचे सरचिटणीस विजय शेलार यांना ही बॅग सापडली. त्यांनी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी रोहोकले यांच्याशी संपर्क केला. त्यांनी डॉ. किरण रोहोकले यांच्याशी संपर्क साधून ही बॅग त्यांच्याकडे सुपूर्त केली. तोपर्यंत ती विद्यार्थिनी नगरला पोहोचली होती. डॉ. रोहोकले यांनी बॅग मिळाल्याबद्दल या कार्यकर्त्यांचे आभार मानले व त्यांचा सत्कार केला.
विद्यार्थिनी विशाखा बुलढाण्याला जाण्यासाठी सोमवारी रात्री साडेनऊ वाजता नगर येथील रेल्वेस्थानकावर पोहोचली होती. या दरम्यान, डॉ. किरण रोहोकले यांनी तिच्याशी संपर्क साधत बॅग तिच्याकडे सुपूर्त केली.