पारनेर (नगर ) : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील मांडवे खुर्द येथे सामाजिक वनीकरण विभागांतर्गत दहा हेक्टर क्षेत्रावर सुमारे 11 हजार वृक्षलागवड गेल्या वर्षी करण्यात आली. मात्र, वनविभागाच्या गलथान कारभाराने 80 ते 90 टक्के वृक्षांचा जीव सामाजिक वनीकरण विभागााने घेतला आहे. तर उर्वरित 10 ते 20 टक्के वृक्ष अखेरच्या घटका मोजत आहेत. सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून लाखो रुपयांचा खर्च वृक्षलागवडीसाठी केला जातो. वृक्षलागवड होत असताना खड्डे खोदण्यापासून तीन वर्षे जगविण्याची जबाबदारी सामाजिक वनीकरण विभागाची असते. त्यासाठी शासन लाखो रुपये खर्च करीत असते. मात्र, सामाजिक वनीकरण अधिकारी टेबलवर बसून पद्धतशीरपणे खड्डे घेतात.
त्या खड्ड्यांत कागदावर वृक्षलागवड करून लाखो रुपयांची बिले उकळण्याचे काम केले जाते. असाच प्रकार तालुक्यातील मांडवे खुर्द येथे झाला आहे. तेथे डोंगरावर 10 हेक्टर क्षेत्र पारनेरच्या सामाजिक वनीकरणने जुलै 2022 मध्ये वृक्षलागवडीसाठी घेतले. मोठ्या धडाक्यात चिंच, बांब,ू सिसम, सीताफळ, कांचन, आंबा, करंज आदी वृक्षलागवड करण्यात आली. 11 हजार वृक्षांची लागवड केल्याची माहिती कागदावर आहे. मात्र, प्रत्यक्षात 10 ते 20 टक्के वृक्ष अखेरची घटका मोजत आहेत. वनविभागाचा हा लाखोंचा खर्च नेमका कोणाच्या घशात गेला, याची संबंधित वरिष्ठ अधिकार्यांनी सखोल चौकशी करणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले. वेळेवर योग्य पद्धतीने देखभाल न झाल्याने झाडे जळून गेली. शासन कोणत्याही चांगल्या उपक्रमासाठी लाखो रुपये खर्च करते. परंतु काही ठिकाणी झालेल्या हलगर्जीपणामुळे झाडांची परिस्थिती अतिशय नाजूक झाली आहे.
सामाजिक वनीकरणाच्या संबंधित अधिकार्यांनी खुर्द येथील डोंगरावर वृक्षारोपण करण्याचा प्रोजेक्ट हाती घेतला. मात्र तो अद्याप कागदावरच असून, तो कधी पूर्ण होणार याबाबत सवाल उपस्थित होत आहे.
सामाजिकने पाणी घातले कोणाला?
मांडवे खुर्दमध्ये गेल्यावर्षी वृक्षलागवड झाली. मात्र, लागवडीनंतर फक्त डिसेंबर महिन्यात पाणी घालण्यात आले. त्यानंतर आजपर्यंत त्या वृक्षांना पाणी घातले नाही. अकरा हजार रुक्षलागवडीनंतर सामाजिक वनीकरणच्या अधिकार्यांने नेमके पाणी कोणाला घातले हा सवाल उपस्थित होत आहे.
हे ही वाचा :