कर्जत/राशीन : पुढारी वृत्तसेवा : गोरक्षकांच्या प्रसंगावधानामुळे राशींनमध्ये अनधिकृत कत्तलखान्यावर कारवाई करत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 46 गोवंशीय जनावरांची सुटका केली. तसेच सातशेदहा किलो गोमांस असा एकूण पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
राशीन येथे अनधिकृत कत्तलखान्यामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल सुरू असल्याचे कर्जत येथील गोरक्षक व एकनाथ शिंदे शिवसेनेचे शहरप्रमुख महादेव जठार यांना समजले होते. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या पथकाने पहाटे राशीन येथे कुरेशी मोहल्ल्यात छापा टाकला. त्यात शाहबाज आयुक कुरेशी, सोहेल कुरेशी व सुलतान कुरेशी यांच्या घरात गावरान गाईंची 11 वासरे, 18 जर्सी गाई व 17 जर्सी गाईची वासरे आढळून आली. याशिवाय 710 किलो मांस आढळले. काही म्हशीदेखील होत्या. पोलिस बंदोबस्तात 46 जनावरांची सुटका करण्यात आली. सर्व जनावरे टेम्पो व पिकअप व आयशर टेम्पो यामध्ये कर्जत पोलिस स्टेशनला सकाळी आणण्यात आले.
ऋषिकेश नंदकुमार भागवत यांच्या फिर्यादीवरून कर्जत पोलिसात शहाबाद आयुब कुरेशी, सोहेल कुरेशी व सुलतान कुरेशी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, राशीनमध्ये अनधिकृत कत्तलखान्यामध्ये रोज शेकडो जनावरांची कत्तल होत आहे. याकडे राशीनचे पोलिस दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ऋषिकेश भागवत यांनी केला आहे.
हेही वाचा