संपादित जमीन बेकायदा केली अकृषक

संपादित जमीन बेकायदा केली अकृषक

श्रीगोंदा : पुढारी वृत्तसेवा : सन 1980मध्ये संपादित केलेले लेंडी नाला येथील 3 हेक्टर 09 आर क्षेत्र बेकायदेशीरपणे अकृषक करण्यात आले होते. ही सनद रद्द करण्याचे आदेश तहसीलदार डॉ. क्षितिजा वाघमारे यांनी दिले आहेत. दरम्यान, हे क्षेत्र वरिष्ठ सनदी अधिकारी भाऊसाहेब दांगडे, माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांच्याशी संबंधित असल्याची माहिती तक्रारदार टिळक भोस आणि सतीश बोरुडे यांनी दिली.

याबाबत माहिती देताना टिळक भोस व सतीश बोरुडे म्हणाले की, नगरपालिका हद्दीतील तलावासाठी लेंडी नाला येथील गट नं. 1110मधील 3 हेक्टर 15 आर जमीन 1980मध्ये संपादित करण्यात आली होती. जागेच्या मूळ मालकांच्या वारसांनी ही जमीन माजी नगराध्यक्ष मनोज तथा मनोहर रामदास पोटे, प्राची रोहित दांगडे, रोहित भाऊसाहेब दांगडे, संतोष किसन टकले, गोपाळ वसंतराव पवार, वसुंधरा शशिकांत देशमुख, मोहन बापू शिंदे, संभाजी शिवाजी मोरे, सचिन नारायण कसरे, उमेश कुंडलिक चव्हाण, सोपान नामदेव शिंदे ,चंद्रशेखर पोपटराव काळे, वृषाली कोंडीबा गोरे, लालासाहेब रामचंद्र फाळके, सतीश नारायण कसरे यांना विकली.

ही जमीन बेकायदा अकृषक करण्यात आली होती. संपादित क्षेत्राची अकृषक करण्याची सनद रद्द करण्याची मागणी भोस आणि बोरुडे यांनी केली होती. याबाबत चौकशी करून ही जमीन 1980मध्ये सरकारने संपादित केलेली असल्याने पुढील खरेदी व अकृषक सनद बेकायदेशीर असल्याने ती रद्द करण्याचे आदेश तहसीलदार डॉ. क्षितिजा वाघमारे यांनी 22 मार्च 2024 रोजी दिले आहेत. याबाबत भोस व बोरुडे म्हणाले की, ही जमीन अकृषक करण्यासाठी वरिष्ठ सनदी अधिकारी भाऊसाहेब दांगडे यांनी अधिकार्‍यांवर दबाव आणून जमीन अकृषक करून घेतल्याचा गंभीर आरोप तक्रारदारांनी केला आहे. या प्रकरणात सहभागी असलेल्या जमीन मालकांसह दोषी अधिकार्‍यांवर ठोस कारवाई करावी.

माझा कुठलाही संबंध नाही : भाऊसाहेब दांगडे

संबंधित जमिनीशी आपला काही संबंध आहे का? असे विचारले असता या प्रकरणाशी माझा कुठलाही संबंध नाही, अशी प्रतिक्रिया वरिष्ठ सनदी अधिकारी भाऊसाहेब दांगडे यांनी दिली.

बिनशेती आदेश रद्द करताना आमचे म्हणणे ऐकण्यात आलेले नाही. त्यामुळे तहसीलदारांनी दिलेल्या आदेशाबाबत न्यायालयात जाणार आहोत.

– मनोहर पोटे, माजी नगराध्यक्ष

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news