

गोरख शिंदे :
नगर : जलसंपदा विभागाच्या कुकडी पाटबंधारे विभागाने सीना नदीबाबत खासगी एजन्सी नियुक्त करून 2021 मध्ये महापालिकेला नकाशे सादर केले होते. त्या अनुषंगाने दोन वर्षांनी महापालिकेने सीना नदी हद्द निश्चितीचे प्रत्यक्ष काम सुरू केले आहे. खासगी संस्थेने नदीची हद्द निश्चित करताना केलेल्या कार्यवाहीबाबत महापालिकेच्या नगररचना विभागाच्या नियोजन समितीचे माजी सदस्य आर्किटेक्ट संजय पवार यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनी अनेक मुद्द्यांचा उहापोह करून सूचना केल्या आहेत. नागापूर येथील सीनेवरील पुलाची लांबी मोजून त्यानुसार नदीची रुंदी असल्याचे हद्द निश्चित करण्यासाठी नेमलेल्या एजन्सीने गृहीत धरले आहे.
खरं तर नदीच्या उगमापासून रुंदीचे सर्वेक्षण होणे गरजेचे आहे. कारण, जमिनीच्या विविध भागातून, उंचसखल खाचखळग्यातून, डोंगररांगांतून सीना नदी पुढे शहरात सखल भागात वाहत आहे. त्यामुळे नदीची रुंदी ही अनेक ठिकाणी वेगवेगळी आहे. त्यामुळे इंग्रजांनी तयार केलेले गावनकाशे, महापालिकेचा विकास आराखडा (डी. पी. प्लॅन), भूमी अभिलेख विभागाकडे असणारे संपूर्ण रेकॉर्ड आणि नकाशे यांचा शास्त्रीय अभ्यास होणे गरजेचे आहे.
सीना नदीच्या दोन्ही तीरांवर असणार्या प्रत्येक जमिनीचे मूळ रेकॉर्डवर असणार्या प्रत्येक सर्व्हे नंबरच्या मोजणी नकाशांचे अवलोकन केले पाहिजे. त्यावेळेस असणारे रेकॉर्ड व पन्नास वर्षांनंतर नदी पात्रात काही बदल झाला असल्यास, तो रेकॉर्डवर आणणे महत्त्वाचे आहे. कारण, प्रत्यक्ष जागेवर नदी अस्तित्वात आहे की नाही? नदी प्रवाहामुळे काही भागात गाळपेर तयार झाली आहे का? काही भाग हा पाण्याच्या प्रवाहाने बाधित झाला आहे का? नदीपात्राची ठराविक अंतरावर खोली मोजण्यात आली आहे का? जमिनींच्या रेकॉर्डची माहिती घेण्यात आली आहे का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने निर्माण झाले आहेत.
या सर्व बाबींची सर्वेक्षण करणार्या संस्थेने नोंद घेतली आहे का? ही नोंद घेतली असेल तर उत्तमच. पण, नसेल तर, सर्वेक्षणावरच असंख्य प्रश्न उभे राहतील. त्यामुळे खासगी संस्थेने केलेले सर्वेक्षण, त्यांनी जमा केलेली माहिती, याचा शास्त्रीय अभ्यास होणे गरजेचे आहे. अभ्यास झाला नसल्यास होणार्या नुकसानीस जबाबदार कोण? असा प्रश्न निर्माण होताना दिसत आहे.
'त्या' नकाशांबाबत खात्री व्हावी
वास्तविक महापालिकेने कुकडी पाटबंधारे विभागाकडून हे नकाशे सादर झाल्यानंतर त्यांची खात्री करून घेणे गरजेचे होते. पण, तसे झालेले नाही. यासाठी शहरातील या क्षेत्रात प्रत्यक्ष काम करणार्या अभियंत्याची मदत घेणे गरजेचे आहे. सर्व रेकॉर्ड उपलब्ध करून, त्यावर एखादी समिती स्थापन करून, नागरिकांच्या, शहराच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घेणे उचित होईल.