

मिरजगाव(अहमदनगर) : निम्मा पावसाळा संपत आला तरी पावसाने पाठ फिरवली असून, यामुळे कर्जत, नगर, श्रीगोंद्यासह मराठवाड्यातील आष्टी तालुक्याचे जीवनदायिनी असलेले सीना धरण खपाटीला गेले. सीना धरण लाभक्षेत्रातील, तसेच मिरजगाव क्षेत्रातील खरीप पिके जळण्याचा धोका निर्माण झाला आहे. वरूण राजा कधी बरसतोय…याची शेतकरी व आम जनाचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. या भागात आतापर्यंत 222 मिमी पाऊस झाला आहे. धरणात आज फक्त 26 टक्के पाणीसाठा आहे.
1972मध्ये राज्यात मोठा दुष्काळ पडला होता. यावेळी राज्य सरकारमध्ये स्व. आबासाहेब निंबाळकर पाटबंधारे विभागाचे मंत्री होते. कर्जत तालुक्याच्या उत्तर भागातून सीना नदी वाहते या नदीचे वाहते पाणी अडविले, तर कर्जत व आष्टी भागातील शेतकरी व जनतेला याचा फायदा होईल, अशी कल्पना पुढे आली. यानंतर आबासाहेब निंबाळकर यांनी सीना धरण निर्मितीचा निर्णय घेतला. आर्थिक तरतूदही केली. कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डे येथे सीना नदीवर धरण उभारणी सुरू केली, हे काम 1984ला पूर्ण झाले.
सीना धरणाच्या निर्णयामुळे आबासाहेब निंबाळकरांना सीनापूत्र म्हणून संबोधले गेले. या धरणामुळे 12 हजार 755 हेक्टर क्षेत्राला पाण पुरवठा होतो. गेल्या 38 वर्षांच्या इतिहासात हे धरत 19 वेळा ओव्हर फ्लो झाले. यावर्षी मात्र सीना धरण लाभक्षेत्रात समाधान कारक पाऊस झाला नाही, यामुळे येथे अवघा 25 टक्के पाणीसाठा आहे. निम्मा पावसाळा संपत आला तरी या भागाकडे पावसाने दडी मारली आहे. यामुळे शेतकरी वर्ग चिंतातूर आहे. वरूण राजा कधी येतोय यासाठी आभाळाकडे डोळे लागले आहेत. प्रशासनही पावसाच्या प्रतीक्षेत आहे.
सीना धरणातून शेतीला पाणी देण्यासाठी दोन कालवे काढण्यात आले. उजवा कालव्याद्वारे कर्जत तालुक्यातील 21 गावे वाड्या वस्त्यांना, तसेच या भागातील शेतीला पाणी पुरवठा केला जातो. हा कालवा 73 किलो मीटर लांबीचा आहे. याचा टेल पाटेवाडी येथे आहे.
डाव्या कालव्याद्वारे आष्टी तालुक्यातील पाच गावे, वाड्या वस्त्या, तसेच शेतीला पाणी पुरवठा केला जातो. या कालव्यामधून आष्टी तालुक्यातील मेहेकरी धरणात पाणी सोडता येते. यामुळे सीना धरण कर्जत, आष्टी व श्रीगोंदा तालुक्यातील शेतकर्यांना वरदान ठरले.
कर्जत, आष्टी, श्रीगोंदा, नगर तालुक्यातील शेती व जनतेला वरदान ठरलेल्या सीना धरणाची उंची वाढविण्यासाठी अनेक वेळा मागणी झाली. या विषयावर राजकारण झाले, श्रेय घेण्याचा प्रयत्न झाला, उंची वाढविण्याचा प्रस्ताव तयार केला, तो शासन दरबारी आहे; परंतु त्याचे पुढे काय झाले? हे कोणाला माहित नाही.
सीना धरणाचा उजवा व डावा कालव्यात मोठ्या प्रमाणात वेड्या बाभळी वाढल्या आहेत. याबरोबरच इतर लहान मोठी झाडं-झुडपं वाढली आहेत. झुडपांची तोडणी करून कालवे स्वच्छ करणे आवश्यक आहे. कालवा अस्तरीकरण करणे आवश्यक आहे. जेणे करून पाणी बचत होईल. शेतकर्यांना मुबलक प्रमाणात पाणी मिळेल.
सीना धरणाची निर्मिती करताना या परिसरात मत्स्य बिज केंद्राची निर्मिती करण्यात आली. येथे सर्व सुविधा उपलब्ध आहेत; पण मत्स्य बिज केंद्राची टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली नाही. यामुळे गेल्या काही वर्षांपासून येथील मत्स्य बिज केंद्र बंद आहे. यामुळे रोजगार निर्मिती ठप्प झाली, तसेच शासनाचा महसूल बुडत आहे. यासाठी येथील मत्स्य बिज केंद्र सुरू करणे आवश्यक आहे. तेव्हापासून थेट सीना धरणात मत्स्य पालन केले जाते, याबाबत अधिकारी मोठी गोपनीयता पाळतात.
सीना धरण पहाण्यासाठी येणारे पर्यटक, अधिकारी व कर्मचार्यांना सेवा देण्यासाठी निमगाव गांगर्डे येथे विश्राम गृह उभारले; मात्र संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचार्यांनी येथे वेळोवेळी दुरुस्तीकडे लक्ष देणे आवश्यक होते. मात्र, तसे झाले नाही, यामुळे विश्राम गृहाची दुरवस्था झाली आहे.
नगर व मराठवाडा येथील शेतकरी व सामन्य जनतेची तहान भागविण्यासाठी उपयुक्त सीना धरणाचे काम 1984 मध्ये पूर्ण झाले. तेव्हापासून सीना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसाने पाणी वाहत येते. याबरोबर मातीही वाहून सीना धरणात येत आहे. यामुळे सीना धरणात मोठ्या प्रमाणात माती साठली आहे. यामुळे धरणाची पाणी साठवण क्षमता कमी झाली. यासाठी येथील गाळ, माती काढणे गरजेचे आहे.
हेही वाचा