

श्रीरामपूर : श्रीरामपूर शहर व परिसरामध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणार्या दाभाडे टोळी हद्दपार होऊन चार दिवसांचा कालावधी उलटत नाही तोच चन्या बेग टोळीचे जन 18 महिन्यांकरिता, तर टाकळीभान येथील सोनू ऊर्फ इकबाल सिकंदर शेख या सराईताला 1 वर्षासाठी अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.
शहर पोलिसांच्या प्रस्तावाला जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी मंजुरी देऊन हद्दपारीचे आदेश काढले आहेत. बेग टोळीतील सहा जणांचा हद्दपारीमध्ये समावेश आहे. टोळीप्रमुख सागर ऊर्फ चेन्या अशोक बेग (वय 33), टोळी सदस्य आकाश ऊर्फ टिप्या अशोक बेग (वय 28), जयप्रकाश ऊर्फ सोन्या ऊर्फ सोनू अशोक बेग (वय 38), गोरख ऊर्फ गोर्या विजय जेधे (वय 21, सर्व रा. वॉर्ड नं. 6, डावखर रोड, श्रीरामपूर), सुधीर अरुण काळोखे (वय 37, रा. वॉर्ड नं. 7, सरस्वती कॉलनी, श्रीरामपूर) व लखन प्रकाश माखिजा (वॉर्ड नं.1, श्रीरामपूर) अशी हद्दपारीतील सराईतांची नावे आहेत.
या टोळीने श्रीरामपूर व तालुका, संगमनेर शहर, लोणी, शिर्डी, अ. नगर, तोफखाना, कोपरगाव शहर, नाशिक रोड व औरंगाबाद शहरात क्रांती चौक पोलिस ठाणे हद्दीत गुन्हे केले आहेत. बेकायदा सर्वसामान्य नागरिकांवर दहशत निर्माण करून घातक शस्त्र जवळ बाळगून खून करणे, खुनाचा प्रयत्न, सदोष मनुष्यवध, हल्ला करून दुखापत करणे आदी गुन्हे दाखल आहेत.