

पाथर्डी तालुका (नगर ): पुढारी वृत्तसेवा : पाथर्डी तालुक्यातील अकरा ग्रामपंचायतींमध्ये कायम वर्षानुवर्ष सत्ता गाजवणार्या प्रस्थापितांना मतदारांनी झटका दिला आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत याचे परिणाम होणार आहेत. जिरेवाडी येथील युवा नेते तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष मुकुंद आंधळे यांनी प्रस्थापित पुढार्यांना धूळ चारीत ग्रामपंचायतींमध्ये एकहाती सत्ता मिळविली. कोळसांगवी ग्रामपंचायतीमध्ये भाजपच्या दोन गटांत लढत होऊन, राष्ट्रवादीच्या छुप्या पाठिंब्यावर भाजप आमदार मोनिका राजळे यांचे खंदे समर्थक युवराज फुंदे यांच्या पत्नी सुरेखा युवराज फुंदे यांनी विजय मिळविला.
भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ दौंड, पंचायत समितीच्या माजी सभापती सुनिता दौंड यांच्या नेतृत्वात झालेल्या निवडणुकीत भाजपाने नऊपैकी नऊ जागा मिळवित भाजपाचा गड राखला आहे. निवडणुकीपूर्वीच नऊपैकी पाच जागा बिनविरोध होण्यामध्ये दौंड यांना यश मिळवित विरोधी पॅनलचा धुवा उडवला आहे. कोरडगाव ग्रामपंचायतीत वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष रवींद्र उर्फ भोरु म्हस्के यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने सरपंचासह अकरा पैकी दहा जागेवर विजय संपादन केला. सत्ताधार्यांना अवघी एक जागा मिळविता आली आहे. या ठिकाणी भाजप व राष्ट्रवादी एकत्रित यऊन वंचित बहुजन आघाडीला टक्कर दिली. मात्र, वंचित बहुजने विरोधकांचा पराभव करून तालुक्यात ग्रामपंचायतीमध्ये शिरकाव केला.
तिसगावमध्ये गेल्या 45 वर्षांपासूनची विद्यमान सरपंच काशिनाथ पाटील लवांडे यांच्या गटाची सत्ता धुळीस मिळाली आहे. भाजपाचे इलियास शेख व बाळासाहेब लवांडे यांच्या पॅनलने सत्ता खेचून आणली आहे. वडगाव ग्रामपंचायतीमध्ये गेल्या पन्नास वर्षांपासून स्व.रामकृष्ण भाऊ बडे यांच्या कुटुंबीयांची सत्ता कायम राखत या निवडणुकीतही आदिनाथ बडे यांच्या नेतृत्वाखाली पॅनलने नऊ पैकी सहा जागांवर विजय मिळवित आदिनाथ बडे हे सरपंच झाले आहेत. मोहरी येथील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाच्या दोन गटांत आमने-सामने लढत होऊन विद्यमान सरपंच कल्पजित डोईफोडे यांच्या गटाला धक्का देत, संजय नरोटे यांच्या पॅनलने विजय मिळवित आशाबाई वाल्हेकर या सरपंच झाल्या आहेत.
कोल्हार ग्रामपंचायतीत शिवसेनेचे स्वर्गीय मोहनराव पालवे यांच्या मुलाने सत्ता काबिज केली आहे. या ठिकाणी ठाकरे गटाला विजय मिळविता आला आहे. राष्ट्रवादीचे नेते तथा माजी पंचायत समिती सभापती संभाजी पालवे यांच्या गटाच्या पॅनलचा धुव्वा उडाला आहे. वैजू बाभुळगाव येथे राष्ट्रवादीच्या गटाच्या सरपंच ज्योती संतोष घोरपडे या विजयी झाल्या आहेत. निवडुंगे ग्रामपंचायतीत भाजप गटाचे वैभव देशमुख हे सरपंच पदावर विराजमान झाले असून, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शरद मरकड यांचा पराभव झाला असला तरी मरकड यांनी देशमुखांना चांगली टक्कर दिली आहे. तर, शिवसेना ठाकरे गटाचे बंडू ससे हे पराभूत झाले आहेत.
ग्रामपंचायतच्या सदस्यांमध्ये संमिश्र असे बलाबल निर्माण झाले आहे. भाजपाचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निवडणुकीत त्यांच्या पॅनलचा पराभव झाला आहे. या ठिकाणी भाजप विरुद्ध भाजप असा दुरंगी सामना पाहायला मिळाला. भाजपाचे उमेदवार पोपट रोकडे हे सरपंच पदी निवडून आले आहेत. त्यांना राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी छुपा पाठिंबा दिला होता. भालगावच्या लोकनियुक्त सरपंच मनोरमा खेडकर यांचा सतीश खेडकर यांनी पराभव केला.