नगर : शेवगाव शहर पाणी योजना ; ठेकेदाराअभावी काम पडले लांबणीवर

नगर : शेवगाव शहर पाणी योजना ; ठेकेदाराअभावी काम पडले लांबणीवर

शेवगाव तालुका : पुढारी वृत्तसेवा : शेवगाव शहराच्या पाणीपुरवठा योजनेचे काम ठेकेदाराअभावी लांबणीवर पडत चालले आहे. त्यामुळे या योजनेचे काम विहित मुदतीत पूर्ण होण्याच्या दृष्टीने प्रशासनाने वेगात प्रक्रिया राबविणे गरजेचे आहे. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान योजनेतून शेवगाव शहरासाठी 22 नोव्हेंबर 2022 रोजी 87 कोटी 20 लाख रूपये खर्चाची प्रादेशिक पाणी पुरवठा योजना मंजूर झालेली आहे. सदर योजनेच्या कामासाठी निविदा प्रकाशित झाल्यानंतर पाच निविदा भरण्यात आल्या होत्या. 22 डिसेंबर रोजी या तांत्रिक निविदा उघडल्या असता, यात पाचपैकी दोन निविदा पात्र झाल्या.

मात्र, कमीतकमी तीन निविदा पात्र असणे आवश्यक असल्याचे निकष असल्याने तांत्रिकमध्येच सर्व प्रक्रिया अपात्र झाल्या.त्यामुळे आर्थिक निविदा उघडल्या गेल्याच नाहीत. त्यानंतर फेरनिविदा प्रकाशित करण्यात आल्या असून, त्या भरण्यासाठी 20 फेब्रुवारीपर्यंत अंतिम मुदत होती. यात चार निविदा प्राप्त झाल्या आहेत. त्या आज (दि.22) उघडण्यात येणार आहेत. यातही तीन निविदा पात्र ठरल्यास पुढील प्रक्रिया सुरु होईल, अन्यथा पुन्हा फेरनिविदा मागविण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. परिणामी, यातच योजनेचे काम पुन्हा लांबणीवर पडत जाणार आहे. कार्यारंभ आदेश दिल्यानंतर दीड वर्षात योजना पूर्ण करण्याचा कालावधी आहे. त्यामुळे सध्याची पाणीटंचाई पाहता लवकरात लवकर कार्यारंभ व्हावा, अशी शहरातील नागरिकांची अपेक्षा आहे.

योजना ठरणार जलसंजीवनी !
या योजनेची घरोघर नळजोडणी होणार असून, मुबलक पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून शहरात पाणीटंचाई भेडसावणार्‍या नागरिकांसाठी ही योजना जलसंजीवनी ठरणार आहे. त्यामुळे कुठलाही बाधा न येता योजनेचे काम वेळेत पूर्ण होण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न होण्याची गरज आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news