नगर: चिथावणीखोरांच्या अटकेनंतरच बंद मागे! शेवगावात कडकडीत बंद; मोर्चाला परवानगी नाकारली

नगर: चिथावणीखोरांच्या अटकेनंतरच बंद मागे! शेवगावात कडकडीत बंद; मोर्चाला परवानगी नाकारली
Published on
Updated on

शेवगाव (नगर), पुढारी वृत्तसेवा: छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीवरील दगडफेकीचे पडसाद दुसर्‍या दिवशी मंगळवारी उमटले. चिथावणीखोरांना अटक होत नाही तोपर्यंत शेवगाव शहर बंद ठेवण्याची ठाम भूमिका व्यापार्‍यांनी घेतल्याने प्रशासन हतबल झाले आहे. दरम्यान दोन्ही गटांच्या मोर्चाना पोलिसांनी परवानगी नाकारली. थेट धार्मिक स्थळी जात पोलिसांनी निवेदन स्वीकारले. दरम्यान आणखी 9 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

शेवगावातील मेडिकल स्टोअर व रस्त्यावरील फळ विक्रते वगळता व्यापार्‍यांनी कडकडीत बंद पाळला. शहरात अद्यापही तणावपूर्ण शांतता असली तरी, दंगलीत कोणकोणते अनुचित प्रकार घडले, याची चर्चा गटागटाने सुरू आहे. एकमेकांना व्हिडिओ क्लिप दाखवून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, मंगळवारी दोन्ही गट स्वतंत्र मोर्चाने जात पोलिस प्रशासनला निवेदन देणार होते. मात्र, पोलिसांनी मोर्चाला परवानगी न देता दोन्ही गटाच्या धार्मिक स्थळी जात निवेदन स्वीकारले. अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्याकडे निवेदने देण्यात आली.

सर्व आरोपींना अटक केल्याशिवाय शेवगाव बंद मागे घेणार नाही, अशी भूमिका व्यापार्‍यांनी घेतल्याने मंगळवारीही शहरातील सर्व व्यवहार कडकडीत बंद होते. दगडफेकीनंतर 112 जणांवर गुन्हे दाखल करत 29 जणांना सोमवारी अटक करण्यात आली आहे. मंगळवारी आणखी 9 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

पोलिसांकडून समोपचाराची भूमिका

दरम्यान, अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके, पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांनी मंगळवारी दोन्ही गटातील नागरिकांशी चर्चा केली. दंगलीमध्ये सहभागी असणार्‍यांवर गुन्हे दाखल केले असून, त्यांना त्वरित अटक करण्यात येईल. तसेच, शहरातील अतिक्रणे काढण्यासाठी नगरपरिषदेने सुरुवात केल्यास त्यांना त्वरित बंदोबस्त देण्यात येईल, अशी ग्वाही खैरे यांनी दिली.

पक्षांचे पदाधिकारी गुन्ह्यात अडकले

शेवगाव दगडफेकप्रकरणी पोलिसांनी तब्बल 112 दंगेखोराविरूद्ध जिवे मारण्याचा प्रयत्न, शासकीय कामात अडथळा व कर्मचार्‍यास मारहाण, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, अशा कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन चव्हाण, तालुकाध्यक्ष प्यारेलाल शेख, माजी उपनगराध्यक्ष वजीर पठाण, मनसेचे तालुकाप्रमुख गणेश रांधवणे, शिवेसना (शिंदे गट) तालुकाप्रमुख अशुतोष डहाळे, माजी नगरसेवक सागर फडके, कैलास तिजोरे, बाजार समितीचे संचालक जाकीर कुरेशी, कम्युनिष्ट पक्षाचे संजय नांगरे आदींसह अन्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

दावा एका गटाचा

मिरवणूक शांततेत सुरू असताना छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहचल्यावर अचानक हॉटेल सहारा, खाटीक गल्लीच्या बाजूने मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली. पाकिस्तान जिंदाबाद तसेच धार्मिक घोषणा देत शस्त्राने हल्ला करण्यात आला. दंगेखोरांनी धार्मिक स्थळांवर दगडफेक करत दुचाकी, चारचाकी वाहनांची तोडफोड करत नासधूस केली. मारवाडगल्ली, जैन गल्ली, धनगर गल्ली, वडारगल्ली, भाडाईत गल्ली, राम मंदिर बोळ या भागातील महिलांना अश्लिल भाषेत शिवीगाळ करून लज्जास्पद वर्तन केले. तसेच, पैठण रोड, क्रांती चौक, मिरी रोड या भागातील रस्त्याने ये-जा करणार्‍यांना मारहाण केली. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सर्व हातगाड्या, पाल टाकून बसणारे दुकानदार, पानटपर्‍या, मावा टपर्‍या काढून टाकण्यात याव्यात. अनधिकृत कत्तलखाने बंद करावी. तसेच, दाखल केलेले खोटे गुन्हे त्वरित मागे घ्यावेत, अशा मागण्यांचे निवेदन एका गटाने दिले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news