

करंजी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील प्रत्येक गावांमध्ये 'शासन आपल्या दारी अभियान' राबवले जात असून, या अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक गावात व तालुक्यात शंभर, पाचशे रुपये कागदपत्र काढून देण्यासाठी सुरू झालेली एजंटगिरी संपुष्टात येणार आहे. सर्वसामान्यांची होणारी लूट थांबवण्यासाठी हे अभियान राबवले जात असून, या अभियानाला प्रत्येक गावात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे मिरी-तिसगाव प्रादेशिक नळ योजनेचे अध्यक्ष एकनाथ आटकर यांनी सांगितले.
पाथर्डी तालुक्यातील चिचोंडी येथे चिचोंडीसह इतर चार गावातील ग्रामस्थांसाठी गुरुवारी 'शासन आपल्या दारी अभियान' राबवण्यात आले. यामध्ये ग्रामसेवक, कामगार तलाठी, कृषी, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, वन विभागाचे कर्मचारी सहभागी झाले होते. ज्येष्ठ नेते बबनराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या अभियानामध्ये डोल, कुपणातील नावे कमी करणे, जुने कूपन बदलून देणे, कृषी विभागाच्या योजना, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला यासंबंधी उपस्थितांना योग्य माहिती देण्यात आली.
एजंटगिरी बाबत पालकमंत्री, खासदार डॉ. सुजय विखे, आमदार मोनिका राजळे, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांचे याकडे लक्ष वेधणार आहे. 264 योजना असून, गाव पातळीवर सात महत्त्वाच्या योजना आहेत. यामध्ये ग्रामपंचायत, महसूल, कृषी, आरोग्य, महावितरण, वन विभाग आणि सामाजिक वनीकरण या विभागांनी सर्वसामान्यांना माहिती देऊन राज्य शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देणे गरजेचे आहे. यावेळी बाजार समितीचे संचालक वैभव खलाटे, उपसरपंच प्रमोद जराड, संदीप दानवे, ग्रामसेवक रवींद्र देशमुख, कामगार तलाठी श्रीमती शिरसाठ, कृषी सहायक सचिन मने, विनोद भिंगारदिवे आदींसह लाभधारक उपस्थित होते.