

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : बंदिस्त गटार तुंबल्याने पाथर्डी शहरातील मुख्य रस्त्यावर गटारचे पाणी वाहत आहे. यामुळे रस्त्यावरून ये-जा करणार्यांना दुर्गंधी येत आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरातील अष्टवाडा, रामगिरी बाबा टेकडी परिसरतील काही परिसराचे सर्व घाण पाणी बंदिस्त गटारीतून क्रांती चौकातील मुख्य भूमिगत गटारीला सोडण्यात आले आहे. परंतु, नगरपरिषदेचे पिण्याचे पाणी सुटल्यानंतर या बंदिस्त गटारीच्या चेंबरमधून संपूर्ण पाणी रस्त्यावर वाहते.
त्यामुळे सर्व घाण रस्त्याला पसरून दुर्गंधी होते. या पाण्यामुळे रस्त्यावर डुकरांचा सुळसुळाट होतो. अजंठा चौक ते गांधी चौक असा संपूर्ण वरदळीचा रस्ता आहे. या ठिकाणावरून जाणार्या लोकांना व वाहनधारकांना घाणीच्या पाण्यातून ये-जा करावे लागते. हे घाण पाणी अंगावर उडते. या प्रकाराने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. अनेक दिवसांपासून अशा पद्धतीने नगरपरिषदेचे पाणी सुटल्यानंतर गटारचे पाणी रस्त्यावर येण्याचा प्रकार सुरू आहे.
बहुतांश सकाळच्या वेळी गटारीचे पाणी रस्त्यावर आल्याने या परिसरातील मंदिरे, मशिदमध्ये जाण्यासाठी घाण पाण्यातून वाट काढण्याची वेळ नागरिकांवर येत आहे. ही वेळ नगरपरिषदेच्या बेजबाबदारपणामुळे आली आहे. या परिसरातील भूमिगत गटार मोठ्या आकाराची होण्याची गरज आहे. आकुंचन पद्धतीची जुनी गटार असल्याने गटर लवकर तुंबते व पाणी चेंबरमधून वरती येऊन रस्त्यावर येते. त्यात सकाळी नगरपरिषदेच्या कर्मचार्याकडून वेळेत रस्त्यावरची स्वच्छता न झाल्यास रस्त्यावर असलेला कचराही या पाण्यात वाहतो. पाथर्डी नगरपरिषदेने या कामाकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
मुख्य रस्त्यावरील येणारे गटारीचे घाण पाण्यामुळे प्रचंड त्रास होतो. मैलामिश्रीत पाण्याने दुर्गंधी पसरून आजार पसरत आहेत. येण्या-जाण्यासाठीही मोठी कसरत करावी लागते. पाथर्डी नगरपालिकेने गंभीर्याने लक्ष घालून हा प्रश्न सोडवा.
-शुभम येळाई, क्रांती चौक, पाथर्डी