

कोळपेवाडी : पुढारी वृत्तसेवा : कोपरगाव तालुक्यातील वेस परिसरातील जय मल्हार हॉटेलवर बनावट भिंगरी देशी दारू विक्री करणार्या रॅकेटवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा टाकत पर्दाफाश केला. छाप्यात पथकाने बनावट देशी दारू व मोबाईल यासह एकूण 41,220 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून जालिंदर गोरक्षनाथ चितळकर (रा. सोयगाव, ता. कोपरगाव ) या आरोपीला अटक केली आहे. याबाबत सविस्तर असे, राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार तालुक्यातील वेस येथील वावी-राहाता रस्त्यावरील जय मल्हार हॉटेलवर नगरच्या राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक प्रमोद सोनोने, उपअधीक्षक सुजीत पाटील याच्या मार्गदर्शनाखाली कोपरगावचे निरीक्षक एस. एस. हांडे यांनी छापा टाकला.
या छाप्यात आरोपी जालिंदर गोरक्षनाथ चितळकर (रा. सोयगाव, ता. कोपरगाव) या इसमाकडे अवैध देशी व विदेशी मद्य मिळून आले आहे. यामध्ये देशी दारू भिंगरी 180 मि.ली. क्षमतेच्या बाटल्या बनावट असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच विदेशी दारुचा 1.5 बॉक्स व देशी दारु भिंगरी संत्राच्या 180 मिली क्षमतेचे 48 नगाचे एकूण 4 बॉक्स (खोके) व एक मोबाईल असा एकुण रु.41,220/- किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सदर मद्याबाबत तपास केला असता माल भाऊसाहेब साहेबराव जगताप यांच्याकडून प्राप्त झाल्याचे समजले.
अटक केलेला जालिंदर चितळकर व फरार आरोपी भाउसाहेब जगताप यांच्याविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे. विक्री करणारा मुख्य सुत्रधार भाऊसाहेब साहेबराव जगताप याचा शोध पथक आहेत. सदरच्या कारवाईमध्ये एस. आर. शेलार, सहा. दु. नि.भाऊसाहेब भोर, नारायण ठुबे, जवान सचिन बटुळे, अमिन सय्यद, वर्षा जाधव. पाटोळे आदींचा समावेश होता. या गुन्हयाचा पुढील तपास एस. पी. जाधव, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क कोपरगाव करत आहे.
हेही वाचा :