बचत गटांनी कार्पोरेट ब्रँडिंग बाजारपेठ मिळवावी : ना.राधाकृष्ण विखे

बचत गटांनी कार्पोरेट ब्रँडिंग बाजारपेठ मिळवावी :  ना.राधाकृष्ण विखे
Published on
Updated on

लोणी : पुढारी वृत्तसेवा :  राज्य सरकारसह केंद्र सरकारही बचत गट चळवळीला प्राधान्य देत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला बचत गटाद्वारे 8 कोटी महिलांना विविध उपक्रमांनी जोडले आहे, असे सांगत बचत गटांच्या उत्पादनांनी आता कार्पोरेट ब्रॅन्डींगच्या माध्यमातून बाजारपेठ मिळवावी, अशी अपेक्षा महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पा. यांनी व्यक्त केली.
राज्य शहरी व ग्रामीण जीवन्नोत्रती अभियानांतर्गत जनसेवा फौंडेशन लोणी, पंचायत समिती राहाता, कृषी विज्ञान केंद्र बाभळेश्वर, कृषी विभाग व आत्मा अ.नगर यांच्या संयुक्त विद्यमाने राहाता तालुका सक्षम महिला महोत्सव अर्थात स्वयंसिद्धा यात्रा 2022 प्रदर्शन-विक्री व खाद्य महोत्सवाचे उद्घाटन ना.राधाकृष्ण विखे पा. यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

जिल्हा परिषद माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पा. यांच्या अध्यक्षेतेखाली झालेल्या या कार्यक्रमास, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आशिष येरेकर, कृषी अधीक्षक शिवाजी जगताप, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक सुशिल कुमार पठारे, जिल्हा व्यवस्थापक सोमनाथ जगताप, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, तहसीलदार कुंदन हिरे, तालुका कृषी अधिकारी बापुसाहेब शिंदे, डॉ. हरिभाऊ आहेर, शैलेश देशमुख, ताराबाई खालकर, भाजप युवा मोर्चा सरचिटणीस ऋषिकेश खर्डे, सरपंच कल्पना मैड, उपसरपंच गणेश विखे, माजी उपसरपंच अनिल विखे, सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव धावणे, प्रकल्प अधिकारी रुपाली लोंढे, पदाधिकारी, बचत गट महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.

ना. राधाकृष्ण विखे पा. म्हणाले, महिलांमध्ये बचत गटाद्वारे जागृती, पर्यायी उत्पादने व आत्मविश्वास निर्माण झाला आहे. नाबार्डसह विविध बँका व विविध संस्था त्यांना मदत करीत आहेत. पुर्वी बचत गट स्थापना करावी लागत असे. आता ही एक चळवळ निर्माण झाली आहे. बचत गटांची उत्पादने दर्जेदार आहेत. यामुळे पुरक व्यवसायाला चालना मिळते. बचत गटांनी आकर्षक पॅकींग, ब्रँन्डीगवर भर देण्याची गरज व्यक्त करतानाच राज्य शासन आपल्या बरोबर असल्याचा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

लोकाभिमुख कारभार करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काम करीत असल्याचे सांगत महिला सक्षमिकरण व रोजगार निर्मिती यावरही शासनाचा भर राहिला आहे, असे ना. विखे पा. यांनी स्पष्ट केले. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, पंचायत समिती राहाता व जनसेवा फौडेशन लोणी यांनी पुढाकार घेऊन जिल्हातील बचत गटांचे ब्रॅडींग करावे, यासाठी निधी उपलब्ध करू देवू, अशी ग्वाही ना. विखे पा. यांनी याप्रसंगी दिली. यावेळी जि. प. माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पा. यांनी बचत गटांचे उपक्रम, जनसेवा फौडेशनची वाटचाल या विषयी माहिती दिली. महिलांनी केवळ बचत न करता व्यवसाय करून आपली वेगळी ओळख निर्माण करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.आशिष येरेकर यांनी बचत गटांसाठी सुरु असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. प्रारंभी गटविकास अधिकारी जालींदर पठारे यांनी आपल्या प्रास्ताविकात विविध उपक्रमांची माहिती दिली.

साहित्य, खाद्य महोत्सव खुला

रविवारपर्यंत सुरू असलेल्या या स्वयंसिद्धा 2022 मध्ये शेती तंत्रज्ञान, बचत गटांनी तयार केलेले साहित्य व खाद्य महोत्सव आदी उपक्रम सर्वांसाठी खुले आहेत. यावेळी कृषी विभागाच्या वतीने कृषी यांत्रिकिकरण योजनेतून शेतकर्‍यांना ट्रॅक्टर वितरण करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news