

नगर; पुढारी वृत्तसेवा : एप्रिल, मे महिन्यांतील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाची पूर्वतयारी सुरु झाली. टंचाईग्रस्त गावांना टँकरव्दारे मोफत पाणीपुरवठा करता यावा, यासाठी जिल्हा प्रशासनाने फेब्रुवारी महिन्यात टँकरची निविदा प्रसिध्द केली होती. परंतु दाखल झालेल्या तीनही निविदा अपात्र ठरल्या. त्यामुळे प्रशासनाने दुसर्यांदा निविदा प्रसिध्द केली. 5 एप्रिलपर्यंत निविदा मागविल्या आहेत.
गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यात पाऊस सरासरीपेक्षा अधिक होत आहे. यंदा देखील भरपूर पावसाची नोंद झाली. त्यामुळे जिल्हाभरातील सर्वच विहिरींची पाणीपातळी चांगली आहे. मात्र, एप्रिल व मे महिन्यात संगमनेर, नगर, अकोले, पारनेर, श्रीगोंदा या तालुक्यांतील काही गावांत पाणीटंचाई हमखास निर्माण होते.
या वर्षी देखील 40 ते 50 गावांत पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. या टंचाईग्रस्त गावांना तसेच पावसाळा लांबल्यास पाणीटंचाईग्रस्त गावांची संख्या वाढू शकते. त्यामुळे पूर्वतयारी म्हणून जिल्हा प्रशासनाने फेब्रुवारी महिन्यांत टँकरची निविदा प्रसिध्द केली होती. त्यासाठी तीन निविदा दाखल झाल्या होत्या. मात्र, या निविदा पात्र ठरल्या नाहीत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने पुन्हा मार्च 14 मार्च रोजी टँकरसाठी निविदा प्रसिध्द केली. 5 एप्रिलपर्यंत निविदा स्वीकारल्या जाणार आहेत. या निविदेला किती प्रतिसाद मिळतो याकडे लक्ष लागले आहे.
टँकरसाठी साडेसहा कोटींची तरतूद
जिल्ह्यातील 321 गावे आणि 1 हजार 39 वाड्यांना पाणीटंचाईची झळ बसू शकते. असा संभाव्य अंदाज व्यक्त करीत, यावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने उपाययोजनेपोटी 7.37 कोटींचा टंचाई आराखडा मंजूर केला आहे. यामध्ये टँकरसाठी 6 कोटी 32 लाख रुपयांची तरतुदीचा समावेश आहे.
फक्त शासकीय टँकरचा वापर
गेल्या वर्षी 50 गावे आणि 170 वाड्यांना पाणीटंचाईची झळ बसली. टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी टँकरची निविदा प्रसिध्द केली. परंतु टंचाईग्रस्त गावांची संख्या कमी असल्यामुळे मोटार वाहतूकदार संस्थांचा प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे शासकीय 30 टँकरव्दारे तहान भागविण्यात आली. यंदाही अशीच परिस्थिती दिसते. अद्याप टँकरची मागणी झालेली नाही.