अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : नगर जिल्हा परिषदेतील विविध संवर्गातील रिक्त 937 पदांसाठी 44726 उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले असून, परीक्षा शुल्कापोटी सुमारे 4 कोटींहून अधिक रक्कम या उमेदवारांनी मोजली असल्याची प्राथमिक माहिती समजली. दरम्यान, रिक्त जागा आणि आलेल्या अर्जाची आकडेवारी पाहता एका जागेसाठी सरासरी 48 उमेदवार स्पर्धेत असल्याचे पाहायला मिळत आहे. ग्रामविकास विभागाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषद अंतर्गत गट -क खालील संवर्गातील सरळसेवेच्या रिक्त पदांच्या 937 जागांच्या भरतीसाठी 5 ऑगस्टपासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली होती.
25 ऑगस्ट ही अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख होती. या कालावधीत 937 जागांसाठी 44726 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. या परीक्षेची प्रक्रिया आयबीपीएस या कंपनीमार्फत राबविली जात आहे. तत्पूर्वी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनात सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके यांनी भरती प्रक्रियेसाठी आवश्यक सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर आयबीपीएसने अर्ज प्रक्रिया सुरू केली होती.
झेडपीतील रिक्त जागांसाठी परीक्षा शुल्क म्हणून खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये, मागास प्रवर्गासाठी 900 रुपये आकारण्यात आले. मात्र अगोदरच बेरोजगारी वाढली आहे, अशा परिस्थितीत नऊशे-हजार रुपये मोजून विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरला आहे. या सर्व पदांसाठी सुमारे 44 हजारांपेक्षा अधिक इच्छुकांनी अर्ज सादर केले आहेत. याचा सरासरी विचार करता जवळपास 4 कोटींपेक्षा अधिक रक्कम ही परीक्षा शुल्कापोटी भरण्यात आल्याचे दिसते. दरम्यान, लवकरच परीक्षेची तारीख जाहीर होणार असून, ऑनलाईन पद्धतीने ही परीक्षा घेतली जाणार आहे. त्यासाठी संबंधित कंपनी तयारी करणार असल्याचेही समजते.
हेही वाचा