

राहुरी; पुढारी वृत्तसेवा : महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वनस्पती रोगशास्त्र विभाग व कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणार्या हॉर्टसॅप प्रकल्पामार्फत नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील उंबरे येथील डाळिंब शेती प्लॉटला शास्त्रज्ञांनी भेटी दिल्या. विस्तार शिक्षण संचालक तथा प्रकल्प समन्वयक व वनस्पती रोगशास्त्र व कृषि अणुजीवशास्त्र विभाग प्रमुख डॉ. तानाजी नरुटे, अखिल भारतीय समन्वीत कोरडवाहू फळपीक योजनाचे कनिष्ठ रोगशास्त्रज्ञ डॉ. प्रकाश मोरे, हॉर्टसॅप प्रकल्पाचे संशोधन सहयोगी डॉ. प्रविण खैरे, वांबोरीच्या मंडळ कृषी अधिकारी विनया बनसोडे, राहुरीच्या कृषी अधिकारी पौर्णिमा गाडे व उंबंरे येथील कृषी सहाय्यक कल्पना थोटे यावेळी उपस्थित होते.
भेटी दरम्यान कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, कृषी विभागाचे अधिकारी यांनी शेतकर्यांच्या प्रत्यक्ष शेतावर जाऊन डाळिंब उत्पादक शेतकरी यांच्यामध्ये सविस्तर चर्चा केली. चर्चेदरम्यान शेतकर्यांच्या शंकांचे निरसन करून डाळिंब पिकाच्या अधिक उत्पादनासाठी सविस्तर मार्गदर्शन केले.
सध्या शेतकर्यांच्या डाळिंब पिकावर रसशोषण करणार्या किडींचा व रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. त्यामध्ये फुलकिडे या किडींचा व बुरशीजन्य मर, फल व पानावरील तेलकट डाग या रोगाचा प्रादुर्भाव प्रामुख्याने दिसून येत आहे. त्या अनुषंगाने कीड व रोगाच्या एकात्मिक नियंत्रणासाठी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी शेतकर्यांना सखोल मार्गदर्शन केले.