जामखेड(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील ऐतिहासिक खर्डा गावच्या सरपंच कोण होणार, राष्ट्रवादी सत्ता कायम राखणार की भाजपकडून सत्तांतर घडविणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दोन्ही बाजूंचे सदस्य आठवडाभरापासून सहलीवर गेलेले आहेत. त्यामुळे कोण कोणाच्या गळाला लागले, हे प्रत्यक्ष निवडीच्या दिवशीच स्पष्ट होईल. यानिमित्ताने पुन्हा आमदार रोहित पवार व आमदार राम शिंदे यांच्यात सत्तासंघर्ष सुरू झाला आहे.
खर्डा ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची निवड सोमवारी (दि.5) होणार असून, या पदासाठी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाकडून रोहिणी प्रकाश गोलेकर, तर विरोधी मंडळाकडून संजीवनी वैजिनाथ पाटील यांच्या नावांची चर्चा आहे. ग्रामपंचायतीत सतरा सदस्य संख्या असून, राष्ट्रवादीकडे दहा तर भाजपकडे सात सदस्यांचे संख्याबळ होते. मात्र, दोन वर्षांच्या काळात घडलेल्या काही घडामोडींमुळे राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांनी सत्ताधारी मंडळाची साथ सोडली. तर, विरोधी मंडळाचे एक सदस्य सत्ताधारी मंडळात सामील झाले.
राष्ट्रवादीचे जिल्हा संघटक विजयसिंह गोलेकर हे सत्ताधारी मंडळाचे नेते आहेत. त्यांच्या भाऊजय रोहिणी या सरपंच पदाच्या उमेदवार आहेत. आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सरपंच पदासाठी लागणारे आवश्यक ते संख्याबळ जुळविल्याचा दावा केला आहे. तर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र सुरवसे यांनी ग्रामपंचायतीत सत्तांतर घडवून आणण्यासाठी आमदार राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व्यूहरचना केली असून, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक वैजिनाथ पाटील यांच्या पत्नी संजीवनी या सरपंच पदाच्या उमेदवार आहेत. सुरवसे यांच्या मते दोन्ही बाजूला समसमान संख्याबळ असून, एक सदस्य तटस्थ आहे.या दाव्यावर ते आजही ठाम आहेत.
ग्रामपंचायत सरपंच पदाच्या फेरबदलाचे राजकारण सत्ताधारी मंडळाचे नेते विजयसिंह गोलेकर यांचे राजकीय कसब पणाला लावणारे ठरले आहे. गोलेकर हे राष्ट्रवादीचे जिल्हा संघटक आहेत. मात्र, त्यांना आपल्या सत्ताधारी मंडळाकडून निवडून आलेल्या दहा सदस्यांची मोट बांधून ठेवण्यात अपयश आले. त्यांचे दोन सदस्य विरोधी कंपूत दाखल झाल्याने, ही चुरस निर्माण झाली आहे.
तर, दुसरीकडे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र सुरवसे यांनी विरोधकांचे दोन सदस्य बरोबर घेण्यात बाजी मारली. मात्र, स्वतःचा एक सदस्य त्यांची साथ सोडून सत्ताधारी मंडळात दाखल झाला. याचा अंदाज त्यांना आजही नाही. म्हणजे त्यांच्या विरोधी मंडळातही आलबेल राहिलेले नाही. त्यामुळे दोन्ही नेत्यांची सरपंच निवडीच्या निमित्ताने मोठी दमछाक झाली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
सत्ताधारी मंडळाकडे नऊ, तर विरोधी मंडळाकडे आठ सदस्य, असे बलाबल झालेले आहे. काठावरचे बहुमत असल्याने प्रत्यक्ष निवडीच्या वेळी काही चमत्कार घडतो का? सरपंचाची निवड बहुमताने की दोन्ही बाजूने सदस्यांची फोडाफोडी होऊन ईश्वर चिठ्ठीचा मार्ग अवलंबण्याची वेळ येणार का, हे प्रत्यक्ष निवडीच्या वेळीच स्पष्ट होणार आहे.