

श्रीरामपूर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्यातील चंदनापुरीत सुमारे दीडशे वर्षांपूर्वी सद्गुरु श्रीसाईबाबा काही दिवस वास्तव्यास होते, अशी माहिती जुने जानकर सांगतात. म्हणून श्रीसाई बाबांचे मंदिर व्हावे, अशी ग्रामस्थांची मनोमन इच्छा होती. अखेर लोकवर्गणीतून ती पूर्ण होवून सुमारे 1.10 कोटी रुपयांचे श्रीसाईबाबांचे मंदिर व साईधाम पदयात्री निवास साकारण्यात आले. पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गालगत चंदनापुरी ग्रामस्थांनी 2017 सालामध्ये लोकसहभागातून श्रीसाई मंदिर बांधण्यास सुरूवात केली.
2023 सालामध्ये मंदिर बांधून पूर्ण झाले. मंदिरामध्ये दिंड्या व पायी पदयात्रींसाठी, स्वच्छतागृह, स्वयंपाक गृहासह निवास व्यवस्था केली आहे. श्रीसाई मंदिर बांधण्यासाठी कौसल्या व अनुसया शिवाजी राहाणे यांनी 5 गुंठे जागा दान दिली. जय साई धाम मंदिर पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गाने येणार्या- जाणार्या श्रीसाई भक्तांचे लक्ष वेधून घेत आहे. साईधाम लोकार्पण सोहळ्यानिमित्त गुरुवार दि. 25 मेपर्यंत पारायण सोहळा, श्रीसाई चरित्र वाचन, श्रीमूर्तीची भव्य शोभायात्रा यात्रा, दररोज संध्याकाळी 7 वा. कीर्तन कार्यक्रम होत आहे.