जामखेड; पुढारी वृतसेवा : महाराष्ट्रात सर्वत्र लम्पी स्किन आजाराने थैमान घातले असून, पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मागील दोन-अडीच महिन्यांपासून जामखेड तालुक्यातही लम्पीचा शिरकाव झाला आहे. जामखेड तालुक्यात गायी 58 हजार 891 जनावरे आहेत. 2 सप्टेंबर रोजी जामखेड तालुक्यातील मोहरी गावात हरिदास गोपाळघरे यांच्या गायीला सर्वात आधी लम्पीचा प्रादुर्भाव दिसून आला. यानंतर विविध गावात ही संख्या वाढत जाऊन आजवर बाधित पशूंची संख्या एक हजारांवर पोहचली आहे.
यापैकी 521 जनावरे बरे झाले असून, 347 जनावरांवर उपचार सुरू आहेत, तर 48 जनावरांचा या आजारामुळे मृत्यू झाला आहे. 1 ऑक्टोबरपासून लम्पीचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे पशु पालकांनी गोठे स्वच्छ ठेऊन जनावरांची काळजी घ्या, असे आवाहन गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी केले. लम्पीचा प्रादुर्भावामुळे तालुक्यात थैमान घातले असून, याबाबत गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी जवळा गोयकरवाडी येथील शेतकरी दादासाहेब करगळ लम्पी आजारामुळे दोन गायींचा मुत्यू झाला आहे.
वस्तीवर भेट देऊन त्यांना शासन शेतकर्यांबरोबर असून, झालेल्या नुकसानभरपाईबाबत तातडीने प्रस्ताव देत आहे. तसेच, पशुवैद्यकीय अधिकारी कोठले यांना सर्व जाणवरांच्या तपासणी करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी सांगितले. यावेळी विस्तार अधिकारी भजनावळे, पत्रकार दीपक देवमाने, जवळा ग्रामविकास अधिकारी बबन बहिर, मच्छिंद्र सूळ, भाऊसाहेब सूळ, राजाराम सूळ आदी शेतकरी उपस्थित होते.
जामखेड तालुक्यातील 100 टक्के गायींचे लसीकरण पूर्ण झाले असून, तुलनेने प्रादुर्भाव कमी आहे. तरीही पशुपालकांनी काळजी घ्यावी. घाबरून न जाता तत्काळ पंचायत समिती, पशुवैद्यकीय दवाखाना किंवा पशुसंवर्धन विभागाला संपर्क साधावा.
– डॉ. संजय राठोड, पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती
कोपरगावनंतर जामखेडमध्ये सर्वात कमी
नगर जिल्ह्याचा विचार करता कोपरगाव तालुक्यात सर्वात कमी संख्या व मृत्यू असून, त्यानंतर जामखेड तालुक्याचा क्रमांक लागतो. यासाठी पंचायत समितीचे आरोग्य विभाग तत्काळ दखल घेत असल्याने प्रमाण कमी आहे. पशुपालकांनी लम्पी आजाराबाबत जागृत राहावे. त्यामुळे नुकसान कमी होईल. तसेच जवळा, बोरले, आरणगाव, पाटोदा, खामगाव, भवरवाडी परिसरात लम्पीचा जास्त प्रादुर्भाव दिसून येतो.
नुकसानभरपाईसाठी 20 जनावरांचे प्रस्ताव
लम्पी आजाराने तालुक्यात थैमान घातले आहे. या आजाराने तालुक्यातील 26 जनावरांचा लम्पी आजारामुळे मृत्यू झाला आहे. यापैकी 20 जनावरांचा नुकसानभरपाई प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.
'माझा गोठा स्वच्छ गोठा' मोहीम
'माझा गोठा, स्वच्छ गोठा' ही मोहीम राबवत पंचायत समिती प्रशासन लम्पीबाबत पूर्ण काळजी घेत आहे. गावागावात कीटकनाशकांची फवारणी वरचेवर चालू आहे. 'माझा गोठा, स्वच्छ गोठा' ही मोहीम प्रशासनारर्फे राबविण्यात येत आहे. गोठ्याची दैनंदिन स्वच्छता ठेवावी. डासांपासून जनावरांचे रक्षण करावे.
दानशूरांनी पुढाकार घ्यावा
जामखेड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून लम्पीचा प्रादुर्भाव वाढू लागला असून, 48 जनावरांचा मृत्यू झाला आहे. यासाठी प्रशासनही शर्थीचे प्रयत्न करत आहेत. यासाठी दानशूर नागरिकांनी शेतकर्यांच्या मदतीसाठी पुढे येणे गरजेचा आहे. त्यामुळे लम्पी आजाराबाबत लागणारे औषधे उपचारासाठी समाजातील दानशूर नागरिकांनी पुढे येऊन मदत करण्याचे आवाहन गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी केलेे.