

वाळकी : पुढारी वृत्तसेवा : पिकअप वाहनात दाटीवाटीने बांधून कत्तलीसाठी कत्तलखान्याकडे चालविलेल्या 33 लहान-मोठ्या गोवंशीय जनावरांची नगर तालुका पोलिसांच्या पथकाने सुटका केली. नगर-कल्याण महामार्गावर नेप्ती गावच्या शिवारात सोमवारी (दि.27) रात्री ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर तालुका पोलिसांची आठवडा भरात ही दुसरी कारवाई आहे. कल्याण महामार्गावरून नगरच्या दिशेने एक पांढर्या रंगाचा पिकअप येत असून, त्यात मोठ्या प्रमाणात दाटीवाटीने बांधून कत्तलीसाठी गोवंशीय जनावरे आणली जात असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांना सोमवारी (दि.27) सायंकाळी मिळाली.
संबंधित बातम्या :
माहिती मिळताच त्यांनी पोलिस उपनिरीक्षक युवराज चव्हाण, आनंद घोडके, जगदीश जंबे, दिनकर घोरपडे यांच्या पथकाला कारवाईसाठी पाठविले. या पथकाने नगर कल्याण महामार्गावर सापळा लावला. थोड्याच वेळात त्यांना नगरच्या दिशेने एक पांढर्या रंगाचा पिकअप येताना दिसला. त्यांनी तो थांबवून त्याची पाहणी केली असता, त्यात दाटीवाटीने बांधलेली लहान मोठी गोवंशीय जनावरे दिसून आली.
या गडबडीत पिकअपचा चालक वाहन सोडून अंधारात पसार झाला. मात्र, दुसर्या एकाला पोलिसांनी पकडले. त्याने त्याचे नाव किरण काशिनाथ चव्हाण (वय 29, रा. राजुरी ता.जुन्नर, जि. पुणे) असे सांगितले. तर, पळून गेलेल्या वाहनचालकाचे नाव शाबीर चौघुले (रा. बेल्हे ता. जुन्नर, जि.पुणे) असल्याचे सांगितले. पोलिसांनी पिकअप, तसेच लहान-मोठी 33 गोवंशीय जनावरे, असा 3 लाख 66 हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. जनावरांची रवानगी गोशाळेत करण्यात आली आहे. शाबीर चौघुले व किरण चव्हाण या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
आठवड्यापूर्वी 42 जनावरांची सुटका
तालुका पोलिसांच्या पथकाने एका गोरक्षकाच्या मदतीने 21 नोव्हेंबरला नगर-कल्याण रसत्यावर नेप्ती बायपास चौकाजवळ एक पिकअप वाहन पकडून कत्तलीसाठी चालविलेल्या 42 लहान-मोठ्या जनावरांची सुटका केली होती. त्यावेळीही 3 लाख 70 हजारांचा मुद्देमाल जप्त करून दोघांविरोधात गुन्हा दाखल केला होता.