नगर : पुढारी वृत्तसेवा : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडाची सुनावणी सुरू झाली तेव्हापासून मीडिया ट्रायल म्हणजेच माध्यमांच्या वृत्तांकनामुळे सुनावणीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त करत हा खटला नगरऐवजी ठाणे किंवा नाशिक येथील न्यायालयात चालवावा अशी मागणी मुख्य आरोपी बाळ बोठे पाटील याने औरंगाबाद खंडपीठात केली आहे. यशस्विनी ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची 30 नोव्हेंबर 2020 रोजी जातेगाव घाटात गळा चिरून हत्या करण्यात आली होती.
पोलिसांनी या खून प्रकरणात सुरूवातीला ज्ञानेश्वर उर्फ गुडू शिवाजी शिंदे (श्रीरामपूर), फिरोज राजू शेख (राहूरी), आदित्य सुधाकर चोळके (कोल्हार बुद्रुक), सागर भिंगारदिवे आणि ऋषिकेश पवार (नगर) या 5 आरोपींना अटक केली होती. त्यानंतर फरार असलेल्या मुख्य आरोपी बाळ बोठे याला हैद्राबाद येथून अटक केली. तसेच, फरार असताना बोठेला मदत करणार्या जनार्दन अकुला चंद्रप्पा (रा. रामनगर, हैद्राबाद), पी.अनंतलक्ष्मी व्यंकटम सुब्बाचारी (रा.हैद्राबाद), राजशेखर अजय चाकाली (रा.आंध्र प्रदेश), शेख इस्माईल शेख अली (रा.आंध्रप्रदेश), अब्दुल रहेमान अब्दुल अरिफ (रा.आंध्र प्रदेश) व महेश वसंतराव तनपुरे (नगर) या सहा जणांचाही आरोपींमध्ये समावेश करण्यात आला. खटल्यातील 12 आरोपींपैकी महिला आरोपी पी.अनंतलक्ष्मी सुब्बाचारी अद्यापही पसार आहे.
दरम्यान, जरे हत्याकांडाची नगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी सुरू झाल्यापासून मीडियाच्या वृत्तांकनामुळे खटल्याच्या सुनावणीवर प्रभाव पडत असल्याचे बाळ बोठे याने औरंबाद खंडपीठात दाखल केलेल्या अर्जात म्हटले आहे. खटल्याची सुनावणी ठाणे किंवा नाशिक न्यायालयात करण्याच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल अर्जावर पुढील आठवड्यात सुनावणी होणार असल्याचे समजते. न्यायालयाकडून सरकारी पक्षाला सुनावणीसाठी हजर राहण्याबाबत समन्स बजावण्यात आले असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
बाळ बोठेला फरार असताना कोणतीही मदत केली नसल्याने, गुन्ह्यातून वगळण्यात यावे, असा अर्ज राजशेखर अजय चाकाली, शेख इस्माईल शेख अली, अब्दुल रहेमान अब्दुल अरिफ (तिघेही रा.आंध्र प्रदेश) या आरोपींनी केला आहे. या अर्जावर बुधवारी (दि.16) सुनावणी पार पडली असून, न्यायालयाने दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यावर 22 नोव्हेंबरला निर्णय होणार आहे.
बाळ बोठेला फरार असताना आरोपींनी मदत करण्यासोबतच मोबाईल व सीमकार्ड उपलब्ध करून दिल्याने पोलिसांच्या कारवाईत अडथळे निर्माण झाले, तसेच गुन्ह्यातून आरोपींना वगळल्यास साक्षीदारांवर दबाव येण्याची भीती असल्याचा युक्तीवाद सरकार पक्षातर्फे करण्यात आला. विशेष सरकारी वकील अॅड. यादव पाटील यांना मदतनीस म्हणून अॅड.सचिन पटेकर यांनी काम पाहिले.