श्रीगोंदा : पुढारी वृत्तसेवा : श्रीगोंदा तालुका व शहर दूध उत्पादक संघर्ष समितीच्या वतीने श्रीगोंदा शहरात रविवारी (दि.19) महात्मा फुले सर्कलजवळ दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलना दरम्यान दूध उत्पादक शेतकर्यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. पिण्याच्या पाण्याची बाटली वीस रूपयांना मिळत असताना, दुधाचा 1 लिटरचा बाजारभाव हा 25 रुपये आहे. एकंदरीत दूध उत्पादनाचा खर्च पाहता आज शेतकर्यांच्या हातात काहीच शिल्लक राहत नाही. प्रत्येक व्यापाराला त्याच्या मालाचा भाव ठरविण्याचा अधिकार आहे. परंतु, दुर्दैवाने शेतकर्यांनी उत्पादित केलेल्या कुठल्याही मालाचा भाव त्याला ठरविता येत नाही.
संबंधित बातम्या :
याच उद्देशाने दूध उत्पादक संघर्ष समितीचे अध्यक्ष सोनू कोथिंबिरे, अरविंद कापसे, कालिदास कोथिंबिरे, संदीप कोथिंबिरे, सागर रसाळ यांनी गेल्या आठवड्यात रविवारी रास्ता रोको आंदोलन करण्याबाबत तहसील कार्यालय व पोलिसांना निवेदन दिले होते. यावेळी बीआरएसचे घनश्याम शेलार, टिळक भोस, राजेंद्र म्हस्के, एम. डी. शिंदे, सुधीर खेडकर, संतोष कोथिंबिरे, प्रशांत गोरे, सतीश मखरे, प्रदीप लोखंडे, मंगेश मोटे, सागर रसाळ, अवधूत जाधव, राहुल वडवकर, दिलीप लबडे, नानासाहेब शिंदे, गोरख आळेकर, बंटी बोरुडे, विनोद होले, समीर कोथिंबिरे आदींसह शेतकरी उपस्थित होते.
पालकमंत्री तथा दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे यांनी दुधाला 34 रुपये हमीभाव जाहीर केला असला तरी तो मिळत नाही. पालकमंत्री विखे यांनी लक्ष घालून शेतकर्यांना न्याय देण्याची भूमिका घ्यावी.
– घनश्याम शेलार, बीआरएस नेते
..तर दुधाचा टँकर जाऊ देणार नाही
दूधउत्पादक संघर्ष समितीचे अध्यक्ष सोनू कोथिंबिरे यांनी मागण्या मान्य न झाल्यास श्रीगोंदा तालुक्यातून एकही दुधाचा टँकर तालुक्याबाहेर जाऊ देणार नाही, असा इशारा राज्य सरकारला दिला आहे.
मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार
पुढील आठवड्यात दूध व शेतीमालाला योग्य भाव मिळावा, यासाठी शिवसेनेचे नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देणार आहेत, असे प्रशांत गोरे यांनी सांगितले.