शाळेच्या आवारात सर्रास गुटखा विक्री : नागरिकांकडून कारवाईची मागणी

शाळेच्या आवारात सर्रास गुटखा विक्री : नागरिकांकडून कारवाईची मागणी

नगर : पुढारी वृत्तसेवा : शाळा, महाविद्यालयाच्या आवारात गुटखा विक्रीला बंदी असताना कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत सर्रास गुटखा व मावा विक्री सुरू आहे. सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्या हल्ला झाल्यानंतर पोलिसांनी शाळेच्या परिसरातील टपर्‍यांवर कारवाई केली. मात्र, आता पुन्हा गुटखा व मावा विक्री तेजीत आहे. तर, पोलिसांकडून सोईस्कर दुर्लक्ष केले जात आहे.शाळा, महाविद्यालयाच्या आवारात शंभर मीटरच्या आत गुटखा, मावा, मद्य विक्रीला बंदी आहे. तसे राज्य शासनाचे परिपत्र आहे. तरीही नगर शहरात शाळा, महाविद्यालयाच्या आवारात अवैध गुटखा व मावा विक्री जोरात सुरू आहे.

गेल्या सहा महिन्यांपूर्वी शहरातील सीताराम सारडा विद्यालयाच्या प्रवेशद्वारातील तंबाखू व पान टपरी हटविण्यासाठी पोलिस व महापालिकेकडे तक्रार केली होती. त्यावरून सामाजिक कार्यकर्ते तथा सारडा विद्यालयाचे मुख्याध्यापक हेरंब कुलकर्णी यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. त्याचे राज्यभर पडसाद उमटले होते. पोलिस अधीक्षकांच्या आदेशावरून कोतवालीसह तोफखाना पोलिसांनी शाळेच्या आवारातील पान टपर्‍या हटविल्या. त्यानंतर दोन्ही पोलिस ठाण्याच्या अधिकार्‍यांची बदली झाल्याने पुन्हा शाळांच्या आवारात तंबाखू, गुटखा विक्री जोरात सुरू झाली.

शहरातील भाऊसाहेब फिरोदिया, महापालिकेची महात्मा फुले शाळा, गुगळे हायस्कूल, न्यू आर्टस् महाविद्यालय अशा शाळा, महाविद्यालयाच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थाची विक्री सुरू आहे. तसेच, कोतवाली व तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत अन्य शाळांच्या आवारात शंभर मीटरच्या आत पुन्हा अवैध टपर्‍यांची रेलचेल आहे. पोलिसांनीही त्याकडे सोईस्कर दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. पोलिस ठाण्याचे बीट अंमलदार, पेट्रोलिंग करणारे पोलिस पथक नेमके करते काय असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे. शाळाच्या आवारात पान टपर्‍या व तंबाखू विक्री करणार्‍या टपर्‍या तत्काळ बंद कराव्यात, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

अन्न व औषध प्रशासनाचे साफ दुर्लक्ष

शाळा, महाविद्यालयाच्या आवारात तंबाखूजन्य पदार्थ, मावा विक्री तेजीत आहे. अन्न व औषध प्रशासनाने अशा टपर्‍यांवर कारवाई करणे अपेक्षित आहे. परंतु, अन्न व औषध प्रशासन विभागाला त्याचे काहीही देणे घेणे नाही. तंबाखूजन्य पदार्थाची सर्रास विक्री होत असतानाही अन्न व औषध प्रशासन त्याकडे डोळेझाक करीत आहे.

शाळेच्या परिसरातील शंभर मीटर अंतरावर असणार्‍या टपर्‍यांवर कायद्यानुसार कारवाई सुरू केली आहे. त्याच्याकडून दंड आकारण्यात येत आहे. संबंधित पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्‍यांना कडक कारवाईच्या सूचना दिल्या आहेत.

– अमोल भारती, पोलिस उपअधीक्षक, नगर शहर

ज्या शाळेच्या परिसरात अशा टपरी आहेत. त्यांनी धाडस दाखवून तक्रार करण्याची गरज आहे. ज्या पालकांची मुले शिकतात. त्या पालकांनी शाळेच्या पाठीशी ताकद उभी करायला हवी. तरच ही निघालेली अतिक्रमणे कायम दूर होतील. सुदैवाने माझ्यावरील हल्ल्यानंतर समाज व मीडिया जागृत झाल्याने शाळांनी घाबरण्याचे कारण नाही.

– हेरंब कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news