नेवासा, कर्जत, शेवगाव तालुक्यांना पावसाने झोडपले

नेवासा, कर्जत, शेवगाव तालुक्यांना पावसाने झोडपले

नगर :  पुढारी वृत्तसेवा : आठ -दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर गुरुवारी रात्री नगर शहरासह जिल्हाभरात पावसाने दमदार हजेरी लावली. नेवासा, कर्जत, शेवगाव, जामखेड, श्रीगोंदा व श्रीरामपूर तालुक्यांना पावसाने झोडपून काढले. भवर नदीला पूर आल्याने जामखेड-कर्जतला जोडणारा रस्ता पुरात वाहून गेेला. त्यामुळे रात्रभर वाहतूक ठप्प होती. जामखेड येथील भुतवडा तलाव भरल्याने विंचरणा नदीला देखील पूर आला आहे. नेवासा तालुक्यात देखील मुसळधार पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. नेवासा खुर्द मंडलात अतिवृष्टी झाली. गेल्या 24 तासांत जिल्ह्यात सरासरी 25.9 मि.मी. पावसाची नोंद झाली. दुसर्‍या दिवशीही सूर्यदर्शन झाले नाही. नगर शहर व परिसरात सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत गारवा निर्माण केला.

सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. पाऊस गेला असे वाटत असतानाच गुरुवारी सायंकाळी शहर व परिसरात पावसास जोरदार सुरुवात झाली. शहराबरोबरच जिल्ह्यात सर्वत्र कमी -अधिक पाऊस झाला. या पावसामुळे काढणीला आलेली खरीप पिके सडू लागली आहेत. या पावसामुळे खरीप पिके हातची जाऊ लागल्याने शेतकरी चिंतातूर झाला असून, तत्काळ नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी वाढू लागली आहे.

नेवासा तालुक्यात सर्वाधिक 45.5 मि.मी. पाऊस झाला. या पावसामुळे सोनई, कुकाणा, शिंगणापूर, बेलपिंपळगाव आदी ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली. नेवासा खुर्द मंडलात 99.2 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सोनई मंडलात 62.3 मि.मी. पाऊस झाला आहे. त्यामुळे परिसरातील ओढे, नाले वाहू लागले आहेत. जिल्ह्यातील तब्बल 45 महसूल मंडलांत 20 मि.मी.पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. दुसर्‍या दिवशी शुक्रवारी देखील पावसाने हजेरी लावली. नगर शहरात सायंकाळी 5 वाजता जोरदार पावसाने हजेरी लावीत जनजीवन विस्कळीत केले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news