

राहुरी; पुढारी वृत्तसेवा : राहुरी बसस्थानकाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आ. प्राजक्त तनपुरे यांनी विधान भवनामध्ये प्रश्न उपस्थित केला. दरम्यान, मंत्री दादा भुसे यांनी आ. तनपुरे यांच्या सुचनेवर कार्यवाही करण्याचे आश्वासन देत बस स्थानकाचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. विधान भवनात सुरू असलेल्या अर्थ संकल्पामध्ये अंतिम आठवड्यातील प्रश्नोत्तरावेळी आ. तनपुरे यांनी राज्य शासनाचे विशेष लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. राहुरीतील बस स्थानक इमारतीची दुरवस्था मांडली. आ. तनपुरे यांनी मंत्री भुसे यांच्याकडे बस स्थानक इमारतीला तत्काळ निधी देण्याची मागणी केली.
आ. तनपुरे म्हणाले, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राहुरी बस स्थानक इमारतीस निधी मंजूर केला होता, परंतु एसटी कर्मचार्यांचा संप व कोरोना कालखंडामध्ये त्या निधीचा इतरत्र उपयोग करावा लागला. राहुरी बस स्थानक राष्ट्रीय महामार्गावर आहे. शिर्डी व शनिशिंगणापूर येथील भाविकांमुळे राहुरी बस स्थानकास मोठे महत्व आहे, परंतु बस स्थानकाची इमारत कोणत्याही क्षणी कोसळेल, अशा दुरावस्थेत असल्याने परिवहन अधिकारी, कर्मचार्यांसह प्रवाशांच्या जिवाला धोका होऊ शकतो. यासाठी शासनाने तत्काळ दखल घ्यावी. बीओटी तत्वावर का होईना राहुरी बस स्थनाकाच्या इमारतीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आ. तनपुरे यांनी लक्षवेधी मांडली.
यावर मंत्री भुसे म्हणाले, राज्यातील 13 ठिकाणावरील बस स्थानकांबाबत पीपीपी मॉडेलवर प्रस्ताव मांडण्यात आले होते, परंतु त्यास प्रतिसाद मिळाला नाही. बस स्थानक इमारतींबाबत अभ्यास गट तयार केला जाईल. राज्य परिवहन मंडळ आर्थिक अडचणीमध्ये आहे. राहुरी बस स्थानकाबाबत तातडीने उपाययोजना करणे व इमारतीस निधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, आ. तनपुरे यांनी लक्षवेधी मांडत पाथर्डीतील केशव शिंगवे गावातील चार शेतकर्यांची पाईप लाईन करताना फसवणूक झाल्याचे सांगितले. 12 कि. मी. लांबीची पाईप लाईन करताना अडीच कोटी रूपये खर्च केले. बँकेचे कर्ज तसेच घरातील दागिणे मोडून शेतकर्यांनी पाईप लाईन तयार केली, परंतु काम करणार्या कंपनीने बोगस काम केल्याने पाण्याचा थेंबही शेतकर्यांना मिळाला नाही. याउलट वीज बिल वसूल केले जात आहे. औरंगाबाद येथेही संबंधित कंपनीने अनेकांची फसवणूक केली आहे. अशा कंपनीला काळ्या यादीत टाकून अधिकार्यांना नोटिस काढाव्या, अशी मागणी आ.प्राजक्त तनपुरे यांनी यावेळी बोलताना केली.
विद्युत सहाय्यक, उपकेंद्र भरतीस चालना द्यावी!
आ. तनपुरे यांनी लक्षवेधीमध्ये महावितरणच्या पदभरतीच्या मुद्याला फोडणी दिली. विद्यूत सहाय्यक व उपकेंद्र पदाच्या भरतीचा तिढा अनेक वर्षांपासून सुरू आहे. कोरोना कालखंडामुळे भरतीस अडचण होती, परंतु आता भरती पूर्ण करण्याची मागणी आ. तनपुरे यांनी विधान भवनात केली.