

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : राहुरी तालुक्यात सद्यस्थितीला सहकार क्षेत्रात अग्रक्रमांकावर असलेल्या राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत रंगत वाढली आहे. तनपुरे गटासाठी एकहाती असणारी बाजार समितीची निवडणूक विखे-कर्डिले यांच्या एकीने अटीतटीची होईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. बाजार समितीमध्ये एकहाती वर्चस्व राखत माजी सभापती अरूण तनपुरे यांनी कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांच्या माध्यमातून सहकाराला बळकटी दिल्याचे सांगत तनपुरे समर्थक निवडणूक अडचणीची ठरणार नसल्याचा दावा करीत आहेत.
राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीने जिल्ह्यात कांदा व्यापाराबाबत उच्चांक प्रस्थापित करीत पारदर्शकतेला महत्व दिले आहे. राहुरी बाजार समितीने शेतकरी, व्यापारी, हमाल, मापाडी यांच्यासाठी सोय सुविधांवर भर देताना शेतकरी, व्यापार्यांचा विश्वास संपादन केला आहे. परिणामी संस्थेने कोट्यवधी रुपयांचा नफा प्राप्त करीत वार्षिक 600 कोटी पेक्षा अधिक उलाढाल करीत यंदाही विकासात्मक आलेख उंचावत ठेवला आहे. संस्थेमध्ये अनेक वर्षांपासून माजी सभापती अरुण तनपुरे यांची एकहाती सत्ता राहिली.
1986 पासून माजी खासदार प्रसाद तनपुरे व माजी सभापती तनपुरे यांनी बाजार समितीमध्ये लक्ष केंद्रीत करीत शिस्तबद्धता व पादर्शकतेला महत्व दिले. कोट्यवधींच्या ठेवी, सूतगिरणी जमिन खरेदी करीत विस्तार, कांद्याबाबत शाश्वत दर मिळणारी बाजार समिती अशी ख्याती निर्माण झालेली बाजार समिती म्हणून राहुरीचा गौरव होत आहे. आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या पाठबळाने तनपुरे गटाला अधिक महत्त्व मिळाले.
दरम्यान, या निवडणुकीपूर्वी खासदार डॉ. सुजय विखे व माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी हातात देत देताना बाजार समितीसाठी पुढाकार घेतल्याचे चित्र आहे. गटा गटात गुप्त बैठकांना पाठबळ देत विखे-कर्डिले यांनी निवडणुकीबाबत चाणाक्ष निती आखल्याचे बोलले जात आहे. जिल्हा बँकेमध्ये विखे-कर्डिले गटाने महाविकास आघाडीला सत्तेतून हद्दपार करताना जिल्ह्यात किंगमेकरचा करिष्मा दाखवून दिला. त्यामुळे राहुरी बाजार समितीमध्ये विखे-कर्डिले जोडी पुन्हा करिष्मा दाखविणार असल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे.
यासह स्व. शिवाजीराजे गाडे यांच्या विचाराचे शेतकरी मंडळ हे राष्ट्रवादीच्या झेंड्याखाली तनपुरेंना पाठबळ देणार हे निश्चित झाल्याचे बोलले जात आहे. तसेच काँगे्रस पक्ष व स्व. रामदास धुमाळ मंचने सत्ताधारी तनपुरे गटाकडे काही जागा मिळाव्या म्हणून गळ घातलेली आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत सेवा संस्था गटातून एकूण 160 जणांनी अर्ज दाखल केले आहे. तर ग्रामपंचायत गटातून 55 इच्छुकांनी तर हमाल-मापाडी 7 तर व्यापारी – आडते 7 असे एकूण 229 इच्छूक उमेदवारांनी संचालक होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.राहुरी बाजार समितीमध्ये एकूण 18 संचालक निवडून द्यायचे आहे. त्यामध्ये सेवा संस्था गटातून 11, ग्रामपंचायतीतून 4, व्यापारी 2 तर हमाल,कामगारातून 1 असे संचालक निवडले जाणार आहे.
विखे-कर्डिलेंचा आत्मविश्वास दुणावला
जिल्हा बँकेत करिष्मा दाखविताना विखे-कर्डिले गटाने महाविकास
आघाडीच्या जबड्यातून जिल्हा बँक हिसकावली. अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांसह खासदार डॉ. सुजय विखे यांनी लक्ष केंद्रीत केल्याने भाजपच्या नेत्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे.
समविचारी पक्षाला जागा मिळाव्यात : धुमाळ
काँगे्रस पक्ष व स्व. रामदास धुमाळ मंचचे अमृत धुमाळ यांनी सत्ताधारी
तनपुरे गटाने श्रीरामपूर मतदार संघातील 32 गावांना न्याय देण्याची मागणी केली आहे. योग्य न्याय देत जागा मिळाव्यात, अशी अपेक्षा धुमाळ यांनी केली आहे.
तनपुरे गट निवडणुकीत सक्षमपणे उतरणार
बाजार समितीचा कारभार करताना पारदर्शकतेला महत्त्व दिले. कोट्यवधी
नफा प्राप्तीतून संस्थेचे हित जोपासले आहे. इच्छुकांची संख्या अधिक आहे. अर्ज माघारीनंतरच सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. तनपुरे गट सक्षमपणे निवडणुकीत उतरणार असल्याचे माजी सभापती अरुण तनपुरे यांनी सांगितले.