शिर्डी : दुसर्‍याच्या अवमानाचा तुम्हाला अधिकार नाही : मंत्री विखे

शिर्डी : दुसर्‍याच्या अवमानाचा तुम्हाला अधिकार नाही : मंत्री विखे

शिर्डी; पुढारी वृत्तसेवा : धिरेंद्र कृष्ण शास्त्रींनी श्रीसाईबाबांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याचा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पा. यांनी तीव्र शब्दांमध्ये निषेध व्यक्त केला. धर्माचा काय प्रचार करायचा तो जरुर करा, परंतु दुसर्‍याचा अवमान करण्याचा अधिकार तुम्हाला नाही, अशा शब्दांमध्ये त्यांनी माध्यमांशी बोलताना धिरेंद्र कृष्ण शास्त्रींना खडेबोल सुनावले.

या वादग्रस्त विधानावर भावना व्यक्त करताना मंत्री विखे म्हणाले, धिरेंद्र कृष्ण शास्त्रींकडून यापुर्वी अशी वादग्रस्त विधाने झाली आहेत, मात्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे आव्हान स्वीकारण्यास ते तयार नाहीत, याकडे लक्ष वेधून श्रीसाईबाबांबद्दल अशा पध्दतीची नेहमीच वादग्रस्त विधाने करुन, बुध्दीभेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. यामुळे धार्मिक व सामाजिक तेढ निर्माण होते. अशा बाबा लोकांची वक्तव्य ही केवळ सवंग लोकप्रियतेचे एक थोतांड असल्याची संतप्त प्रतिक्रीया मंत्री विखे यांनी व्यक्त केली.

श्रीसाईबाबांनी आपल्या संपुर्ण वाटचालीत माणसांमध्येच देव पाहिला. म्हणूनच श्रीसाईबाबांचा 'सबका मालिक एक' हा मुलमंत्र आपण म्हणतो. श्रध्दा व सबुरीचा महामंत्र त्यांनी अवघ्या विश्वाला दिला. त्या आधारेच आज संपूर्ण विश्वाची वाटचाल सुरु आहे. लाखो भक्तांचे ते श्रध्दास्थान आहेत. कुणाच्या श्रध्देवर चिखलफेक करण्याचा कोणालाही अधिकार नाही, अशा शब्दांमध्ये धिरेंद्र कृष्ण शास्त्रींच्या वक्तव्याचा मंत्री विखे यांनी त्यांनी समाचार घेतला.

महाराष्ट्र संताची भूमी आहे. संतांनी समाज उभा करण्याचे मोठे काम केले. त्यांच्यामध्येच आम्ही देव बघतो, परंतु या संतांप्रतीच असणार्‍या श्रध्देला कोणी अवमानित करीत असेल तर ते कदापी आम्ही सहन करणार नाही. धर्माचा काय प्रचार करायचा तो करा, परंतु दुसर्‍याचा अवमान करण्याचा अधिकार तुम्हाला नाही, अशा परखड शब्दांमध्ये धिरेंद्र शास्त्री यांनी केलेल्या वक्तव्यावर पालक मंत्री राधाकृष्ण विखे पा. यांनी टीका करुन आपल्या भावना स्पष्ट केल्या आहेत.

आघाडीमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात संशयकल्लोळ..!
छत्रपती संभाजीनगर येथील महाविकास आघाडीच्या सभेवर भाष्य करताना मंत्री विखे म्हणाले, मुळातच महाविकास आघाडीमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. कोणाचाही एकमेकांवर विश्वास राहिला नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या संदर्भातील वक्तव्यानंतर हे दिसून आले आहे. शिवसेनेने विचारांशीच फारकत घेतल्यामुळे त्यांनी अस्तित्व गमावले. काँग्रेसला स्वत:च्या अस्तित्वासाठी धडपड करावी लागत आहे.

वज्रमुठीकडे कोणीही लक्ष देणार नाही…
दोन्हीही पक्षांचा उपयोग करून, राष्ट्रवादी काँग्रेस फक्त आपली राजकीय पोळी भाजून घेण्याच्या प्रयत्नात दिसत आहे. त्यामुळेच या सभेला वज्रमूठ नाव असले तरी, भविष्यात हेच एकमेकांवर मूठ उगारतील. यांच्या वज्रमुठीकडे आणि उभ्या केलेल्या या तमाशाकडे कोणीही लक्ष देणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर लोकांचा विश्वास आहे. पुढील सर्वच निवडणुकांमध्ये भाजप- शिवसेनाच सत्तेवर दिसेल, असा ठाम विश्वास मंत्री राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news