नगर : विखेंच्या अंगणात थोरातांचा ‘विवेकी’ विजय

नगर : विखेंच्या अंगणात थोरातांचा ‘विवेकी’ विजय
Published on
Updated on

दीपक रोकडे :  राहाता तालुक्यातील (जि. अहमदनगर) श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमदार बाळासाहेब थोरात आणि विवेक बिपीन कोल्हे यांच्या गटाने 18 विरुद्ध 1 असा दणदणीत विजय मिळवला आणि राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना आपल्यात तालुक्यात पराभवाचा मोठा धक्का सहन करावा लागला. विखे यांचे सख्खे शेजारी आणि पारंपरिक विरोधक आमदार थोरात यांनी कोपरगावच्या भाजपच्याच माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे चिरंजीव विवेक कोल्हे यांच्यासोबत आघाडी करत विखे यांना हा शह दिला आहे.

खरे तर हा केवळ एका कारखान्यातील जय किंवा पराजय नसून, याला पारंपरिक राजकीय वैराची आणि विखेंना शह देण्यासाठी एकत्र आलेल्या विचारांची पार्श्वभूमी आहेच; शिवाय कोल्हे यांच्या कारखान्याबाबतच्या अस्मितेची किनारही आहे. राहाता तालुक्यात, शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे राधाकृष्ण विखे सलग सात वेळा आमदार आहेत. त्यांचे पुत्र डॉ. सुजय विखे पाटील हे अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून गेल्या निवडणुकीत विजयी झाले. या निवडणुकीपासून विखे भाजपमध्ये गेले. मात्र त्याआधी ते काँग्रेसमध्ये असतानाही शेजारच्या संगमनेरचे आमदार बाळासाहेब थोरात यांच्याशी त्यांचे वर्षानुवर्षांचे पारंपरिक वैर आहे.

विखे भाजपमध्ये गेल्यानंतर हे वैर हाडवैर झाले. निवडणूक असो वा नसो, हे दोन्ही नेते एकमेकांवर टीका-टिप्पणी करणे सोडत नाहीत. मात्र त्यातही विखे कमालीचे आक्रमक आणि थोरात कमालीचे संयमी अशी दोघांची प्रतिमा आहे. हे वैर खरे तर जिल्ह्याच्या राजकीय पटावरच स्थिरावले असताना विखे यांनी संगमनेर तालुक्यात प्रवेश केला. अगदी थोरातांच्या मूळ गावापर्यंत धडक मारली आणि हाडवैर पक्के होत गेले. थोरातांनीही मग नुकत्याच झालेल्या बाजार समित्यांच्या निवडणुकीत विखेंच्या तालुक्यात 'लक्ष' घातले. या सर्व काळात खासदार विखे यांच्या कडक शब्दांतील टीका बहुतेकदा जिव्हारी लागणार्‍या अशाच असायच्या. तुलनेने थोरात संयमी शब्दांत मांडणी करायचे.

राज्याच्या किंवा जिल्ह्याच्या राजकारणात काहीही असले, तरी जिल्ह्यातील सहकारात राजकारण करायचे नाही, असा आमचा करार आहे, असे विखे मागे एकदा म्हणाले होते. पण थोरातांनी हा अलिखित करार मोडला, त्याला ही पार्श्वभूमी असल्याचे मानले जाते. अर्थात थोरात यांनीही 'गणेश'च्या निवडणुकीत विखेंना नामोहरम करण्यासाठी तेथील विखेंच्या कथित दहशतीचा मुद्दा मतदारांपुढे मांडला. 'तुम्ही मोडायला येता, आम्ही घडवायला चाललोय' हे त्यांचे वक्तव्य खूपच व्हायरल झाले. कोपरगावातील उदयास आलेले नवोन्मेषी नेतृत्व विवेक कोल्हे यांना थोराताच्या या भूमिकेची मोलाची साथ मिळाली. विवेक कोल्हे सध्या शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत.

अत्यंत नम्र आणि अभ्यासू तरुण अशी त्यांची ख्याती आहे. गणेश कारखाना मुळातच कोल्हे यांचा अस्मितेचा विषय आहे. कोल्हे यांचे आजोबा माजी मंत्री दिवंगत शंकरराव कोल्हे यांची 'गणेश'वर तब्बल 37 वर्षे सत्ता होती. 'गणेश'च्या स्थापनेतही त्यांचा मोलाचा वाटा. राहाता तालुकानिर्मितीच्या आधी 'गणेश' कोपरगाव तालुक्यात होता. खासगी व सहकारी मिळून सहा कारखाने असलेला कोपरगाव तालुका त्या वेळी सर्वाधिक कारखान्यांचा तालुका होता. पण गोदावरी कालव्यांच्या पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आणि कोपरगाव व संजीवनी वगळता सारेच कारखाने अडचणीत आले.

पुढे नव्वदच्या दशकात आजारी पडलेला 'गणेश' ऊर्जितावस्थेत आणण्याचे श्रेय शंकरराव कोल्हे यांचेच. कारखाना क्षेत्र राहाता तालुक्यात गेल्यानंतर आणि विखे यांची पुन्हा सत्ता आल्यानंतर मध्यंतरी बराच काळ हा कारखाना बंद होता. नंतर विखे यांनी डॉ. विखे सहकारी साखर कारखान्याशी (प्रवरा) करार करून 'गणेश' चालविण्यास दिला. त्यातील अनेक व्यवहार संशयास्पद असल्याचे आरोप झाले. 'गणेश'च्या कामगार आणि सभासदांचीही नाराजी वाढत गेली. 'संजीवनी'च्या माध्यमातून विवेक कोल्हे यांचे नेतृत्व पुढे आले आणि या 'गणेश' निवडणुकीत सभासदांच्या नाराजीला विखेविरोधाची धार देऊन थोरातांच्या साथीने त्यांनी सत्ता काबीज केली.

गणेश कारखान्याच्या निवडणुकीला जिल्ह्याच्या राजकारणाचीही एक बाजू आहे. त्यातून विखे यांची अनेकांशी 'तू-तू मै मै' होत आहे. त्यातूनच पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांनी विखेंवर टीका करताना गणेशच्या पराभवाच्या जखमेवर मीठ चोळले आहे. 'गणेशमध्ये विखेंचा पराभव म्हणजे दडपशाहीला फुलस्टॉप आहे,' असे ते म्हणाले. डॉ. सुजय विखे यांच्यासमोर लोकसभेला अहमदनगरमधून लंके षड्डू ठोकून उभे ठाकण्याची शक्यता आहे. त्याआधी भाजपचेच आमदार राम शिंदे यांनी विखेंविरोधातील आपले 'विचार' जाहीर केले होते. त्यामुळे जिल्ह्याच्या उत्तरेत अनेक आव्हाने पेलत असतानाच विखे यांना आता दक्षिणेतही विरोधकांचे कडवे आव्हान पेलावे लागणार आहे.

एका कारखान्यातील पराभवाने खचण्याचे कारण नाही, असे राजकीय भाषण विखे करतीलही कदाचित; पण घरच्या मैदानावर झालेल्या पराभवाची जखम भरून येण्यासाठी ते नेमके कोणते ऑपरेशन हाती घेतात, हे येणारा काळच सांगेल. पण थोरातांसारख्या संयमी विरोधकाला, कोल्हे आणि लंकेंसारख्या तरुण नेतृत्वांना, तसेच आ. शिंदेंसारख्या स्वपक्षातील विरोधकांना नमवण्यासाठी ते कोणते पत्ते कसे फेकतात, हे पाहणे औत्सुक्याचा विषय असेल.

हे ही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news