कुकाण्यात अतिक्रमित बांधकामावरून राडा; कार्यकर्त्यांनी अंगावर घेतले पेट्रोल ओतून

कुकाण्यात अतिक्रमित बांधकामावरून राडा; कार्यकर्त्यांनी अंगावर घेतले पेट्रोल ओतून
Published on
Updated on

कुकाणा; पुढारी वृत्तसेवा: नेवासा तालुक्यातील कुकाणा येथे ग्रामपंचायतीच्या मालकीच्या नावाने उतारा असलेल्या जागेवरील अतिक्रमणावरून दोन गट आमने-सामने आल्याने मोठा राडा झाला. एका गटाच्या 20 ते 25 कार्यकर्त्यांनी अंगावर पेट्रोल ओतून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला. कुकाणा येथे गेल्या अनेक दिवसांपासून ग्रामपंचायतीच्या मालकी हक्काच्या जागेवरून मोठा वाद निर्माण झाला आहे.

शनिवारी (दि.29) सकाळी 11 वाजता इनामदार यांच्या गटातील काही लोक कोर्टाच्या मनाई हुकूमाची प्रत सोबत घेऊन या ठिकाणी सुरू असलेले बांधकाम बंद करण्यासाठी गेले होते. परंतु, सदर काम बंद करण्यास अतिक्रमण धारकांनी विरोध केल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्याची माहिती मिळताच तत्काळ घटनास्थळी पोलिस दाखल झाले. पोलिसांनी दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला. परंतु, एका गटाच्या कार्यकर्त्यांनी अंगावर पेट्रोल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील मोठा अनर्थ टळला.

यातील एका गटाचे म्हणणे आहे की, कुकाणा गावठाणामध्ये इनामदार कुटुंबियांची 12 एकर इनामी जमीन आहे. या जमिनीवर कुकाणा येथील काही धनदांडग्यांनी लोकप्रतिनिधींना हाताशी धरून पक्के बांधकाम केले आहे. यामध्ये भाजपाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी स्वतःचे संपर्क कार्यालय, तसेच शोरूम देखील थाटले आहे. या जमिनीबाबत औरंगाबाद येथील वक्फ ट्रिब्युनलमध्ये वाद सुरू असून, ट्रिब्युनलने पक्के बांधकाम करण्यास मनाई हुकूम दिलेला आहे. असे असतानाही या आदेशाला न जुमानता पक्की बांधकामे सुरु आहेत, असा आरोप मुसाभाई इनामदार आणि सलीम शहा यांनी केला आहे.

तर, दुसर्‍या बाजूचे म्हणणे आहे की, आम्हाला गेल्या 50 वर्षांपासून ग्रामपंचायतीने त्यांच्या मालकीची असलेली जागा व्यवसाय करण्यासाठी दिलेली आहे. आम्ही गेल्या अनेक दिवसांपासून त्या ठिकाणी बांधकाम करून व्यवसाय करत आहोत. काही लोक बळजबरीने दादागिरी व दहशत करून आमची कामे बंद करण्यासाठी, जमावाने येऊन दहशत निर्माण करत आहेत. सदर लोकांचा वाद हा ग्रामपंचायतीसोबत असून, प्रत्यक्ष आमच्या सोबत त्यांचा वादाचा कुठलाही प्रश्न राहत नाही.

तसेच, मनाई हुकूमबाबत अद्याप आम्हाला कोर्टाकडून कुठलीही नोटीस मिळालेली नाही. त्यामुळे आम्ही आमचे काम बंद करण्याचा प्रश्न उपस्थित होत नसल्याचे आबासाहेब रींधे, संदीप कोलते, शिवाजी शिंदे यांनी सांगितले दरम्यान, खबरदारी म्हणून पोलिसांकडून दोन्ही गटांच्या 50 ते 60 लोकांविरुद्ध पोलिसांच्या वतीने फिर्याद देऊन गुन्हा दाखल करण्याचे काम शनिवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

पोलिस निरीक्षकांची यशस्वी मध्यस्थी
पोलिस निरीक्षक विजय करे हे क्राईमच्या मीटिंगसाठी नगर येथील पोलिस अधीक्षक कार्यालयात गेले होते. परंतु, तेथे गेल्यानंतर काही क्षणातच कुकाणा येथे घडलेल्या प्रकरणाची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर ते तत्काळ पुन्हा कुकाण्याकडे रवाना झाले. तेथे येताच त्यांनी दोन्ही गटाला शांततेचे आवाहन करून गावातील सरपंच व प्रमुख मान्यवरांना बोलावून चर्चा घडवून आणली. त्यातून योग्य मार्ग काढल्याने सध्यापुरते वातावरण निवळले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news