नगर : विजेअभावी रब्बी पिके धोक्यात

नगर : विजेअभावी रब्बी पिके धोक्यात

वाळकी : पुढारी वृत्तसेवा :  महावितरणने सलग आठ तास मिळणारी वीज चार तासांवर आणल्याने विहिरीत पाणी असूनही उभी पिके विजेअभावी जळू लागली आहेत. हातातोंडाशी आलेला घास वाया जाण्याच्या शक्यतेमुळे संतप्त शेतकर्‍यांसह महावितरण कार्यालयापुढे जनआक्रोश आंदोलन करण्याचा इशारा सरपंच तुकाराम कातोरे, माजी सरपंच वसंतराव ठोकळ यांनी दिला. कामरगाव येथील शेतकर्‍यांना भोयरे पठार येथील उपवीजकेंद्रामार्फत यापूर्वी सलग 8 तास वीजपुरवठा होत होता. परंतु मागील तीन आठवड्यापासून फक्त 4 तास वीजपुरवठा सुरु केला असून, तोही पुरवठा पूर्ण क्षमतेने व पूर्ण वेळ मिळत नाही.

याबबत कामरगाव येथे आमदार नीलेश लंके यांच्या उपस्थितीत झालेल्या विविध विकासकामांच्या शुभारंभ प्रसंगी माजी सरपंच वसंतराव ठोकळ यांनी हा प्रश्न मांडला. सध्या रब्बी गहू, कांदा, हरभरा, भुईमूग फळबागांना पाणी देणे गरजेचे असताना विजेच्या लंपडावामुळे उभी पिके जळू लागली आहेत. शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेल्याने शेतकरी संतप्त झाले असून, सरपंच कातोरे, अशोक कातोरे, सूरज साळी यांनी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता किसन कोपनर यांना लेखी निवेदन दिले. दोन दिवसात वीजपुरवठा नियमित न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. सोमवार, दि. 20 रोजी सकाळी 11 वाजता महावितरण कार्यालयापुढे बोंबाबोंब व जनआक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे.

वीजपुरवठा नियमित करा : आ. लंके
कामरगाव, पिंपळगाव कौडा, वडगाव तांदळीसह अन्य गावांतील शेतकर्‍यांनी विजेबाबत गंभीर तक्रारी केल्या आहेत. याबाबत उपकार्यकारी अभियंत्यांसमवेत बैठक घेऊन वीजपुरवठा नियमित करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे आमदार नीलेश लंके यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news