अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे या योजनेंतर्गत 2022-23 या आर्थिक वर्षात सुमारे 75 कोटींच्या विविध विकासकामांना वेग आला आहे. विशेष म्हणजे पथदिव्यांवरच तब्बल 15 कोटींचा खर्च करण्यात येणार आहे. त्यामुळे आता या वस्त्यांमध्ये दिवाळीपूर्वीच लखलखाट पाहायला मिळणार आहे. जिल्ह्यातील विविध गावांमध्ये सुरू असलेल्या एकूण 1258 कामांपैकी 294 कामे विद्युतीकरणाशी संबंधित असल्याचे जिल्हा परिषदेतून सांगण्यात आले.
समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकासासाठी दरवर्षी जिल्हा नियोजनमधून कोट्यवधींचा खर्च केला जातो. 2022-23 करिता मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांच्या सूचनांनुसार समाजकल्याण अधिकारी राधाकिसन देवढे यांनी 75 कोटींची कामे घेतलेली आहेत. यामध्ये रस्ते, गटार योजना, पाणीपुरवठा, वीजपुरवठा, पथदिवे, सौरदिवे इत्यादीचा समावेश आहे. यातील अनेक कामे सुरू झाली असून, काही कामे लवकरच सुरू होतील, असे प्रशासनाकडून सांगण्यात येते.
ग्रामपंचायतींनी विद्युतची कामे सुचविल्यानंतर ती पंचायत समितीच्या माध्यमातून नगर जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाकडे प्राप्त होतात. या ठिकाणी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हे कामांना प्रशासकीय मान्यता देतात. तांत्रिक मान्यता झेडपीचा विद्युत विभाग देतो. त्यानंतर पुढील निविदा प्रक्रिया त्या त्या ग्रामपंचायतींकडे केली जाते. ग्रामपंचायत पातळीवर 10 लाखांपर्यंतच्या कामांची निविदा प्रक्रिया ही बी-वन, तर पुढील रकमेसाठी ई निविदा प्रणाली राबविली जाते. यातील बी-वन प्रक्रियाही वेगवेगळ्या चर्चांना तोंड फोडणारी दिसते.
दलित वस्तीच्या कामांतील वीजपुरवठ्याच्या कामांचे अंदाजपत्रक हे झेडपीत बांधकाम विभागातून तयार केले जाते. विद्युत विभागातून कामाचे अंदाजपत्रक तयार करण्यात येते. मात्र हे करत असताना कामातील इलेक्ट्रिक साहित्य ठरावीक लोकांकडून खरेदी करण्याबाबतचा आग्रह होत असल्याचे काही ठेकेदारांमधून सांगितले जाते. मात्र असा कोणताही प्रकार होत नसल्याचे सांगण्यात येते.
झेडपीच्या उत्तर विभागात यांत्रिकी विभागाच्या कर्मचार्यावर 'विद्युत'चा भार देण्यात आलेला आहे. मात्र आता विद्युत विभागात पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध झाले आहे. त्यामुळे विद्युत विभागातील सध्याचे प्रभारीराज संपुष्टात येणार असल्याची चर्चा आहे.
मध्यंतरी श्रीगोंदा तालुक्यातील एका अनुसूचित वस्तीतील पथदिवा दुसर्याच ठिकाणी बसविल्याची तक्रार आली. समाजकल्याण अधिकारी देवढे यांनी पाहणी करून बसविलेला पथदिव्याचा खांब काढून तो मूळ वस्तीत बसविल्याचा प्रकार सर्वश्रुत आहे. त्यामुळे असे आणखीही काही प्रकार असतील तर याबाबत तक्रारी द्याव्यात, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
हेही वाचा