

नगर; पुढारी वृत्तसेवा : नगर शहरात एकाच वेळी तीन ठिकाणी एलसीबीने छापे टाकून गोमांस, जिवंत जनावरे व कत्तलीचे साहित्य असा एक लाख 38 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तीन आरोपींना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोतवाली पोलिस ठाण्यात इम्रान वाहिद कुरेशी (रा. हमालवाडा, झेंडीगेट) याच्यावर तर अस्लम मुसा कुरेशी (रा. सईदुकारंजा, झेंडीगेट) व सोहेल रऊफ कुरेशी (रा. सदर बाजार, भिंगार) या दोघांवर तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील झेंडीगेट, हमालवाडा परिसरात तसेच घासगल्ली कोठला अशा तीन ठिकाणी छापे टाकून एलसीबीने ही कारवाई केली.
गोवंश जातीची जिवंत जनावरे कत्तल करण्यासाठी बांधुन ठेवली असून, गोमांसाची विक्री करण्यासाठी घेऊन जाणार असल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 125 किलो गोमांस, जिवंत जनावरे, एक मोपेड, एक वजनकाटा व एक सुरा असा एकूण 1 लाख 38 हजार 100 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
पोलिस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हेशाखेतील उपनिरीक्षक सोपान गोरे, हेड कॉन्स्टेबल बबन मखरे, दत्तात्रय हिंगडे, संदीप घोडके, बापुसाहेब फोलाणे, संदीप पवार, शंकर चौधरी, भिमराज खर्से, सचिन आडबल, आकाश काळे, विनोद मासाळकर, योगेश सातपुते, भरत बुधवंत यांनी कारवाई केली.