

कोपरगाव (नगर), पुढारी वृत्तसेवा: तालुक्यातील मनाई वस्ती, शिंगणापूर परिसरात बिनदिक्कतपणे सुरू असलेल्या गावठी दारूच्या दोन अड्ड्यांवर शहर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारावर अचानक धाडसत्र सुरू केल्याने हातभट्टी चालकांचे धाबे दणाणले आहे. शहर पोलिसांनी येथील मनाई वस्तीजवळील नारांदी नदीचे पात्रालगत काटवनात बुधवारी रोजी सकाळी 6.40 ते 9.45 चे सुमारास 3 तासात दारूच्या दोन वेगवेगळ्या अड्ड्यावर छापा टाकून 43 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अनेक दिवसांपासून तालुक्यातील मनाई वस्ती, शिंगणापूर परिसरात हातभट्ट्यांचा व्यवसाय सुरू केला आहे. याबाबत शहर पोलिस उपनिरीक्षक भरत दाते यांना गुप्त माहितीच्या आधारावर सुगावा लागताच शहर पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ना. एस. आर. शेवाळे, पोहेकॉ. राजेंद्र पुंड, कॉ. गणेश शेवाळे पो. कॉ. भारत खेमनर, पो.ना. राम खारतोडे, म.स.फौ.एन. बी गलांडे यांनी छापा टाकला.
यात काटवनात हातभट्टी सुरू असल्याचे निदर्शनास येताच उपनिरीक्षक दाते यांच्यासह कर्मचार्यांनी घेराव घालून त्यांच्या ताब्यातील गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी लागणारे आंबट उग्रट वास येत असलेले 430 लिटर कच्चे रसायन, शंभर रुपये लिटर प्रमाणे 43 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी श्रावण भरत गायकवाड (वय 25, धंदा मजुरी रा. मनाई वस्ती) याला अटक केलेली आहे. तर नानासाहेब कारभारी गायकवाड पसार झालेला आहे. या दोघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या या कारवाईचे स्वागत होत असून ही कारवाई अशीच सुरू ठेवण्याची मागणी होत आहे.