

वाळकी (नगर ) : पुढारी वृत्तसेवा : कामरगाव व जखणगाव येथील दोन महिलांची फसवणूक करून गळ्यातील सोन्याचे दागिने लांबविणार्या आरोपीस नगर तालुका पोलिसांनी चोवीस तासांत जेरबंद केले. त्याच्याकडून 1 लाख 20 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. ज्ञानदेव हरिभाऊ चेडे (वय 37, रा. पुणेवाडी, ता. पारनेर ) असे या आरोपीचे नाव असून, पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कामरगाव येथील सुलोचना सुभाष कातोरे या 5 जूनला सकाळी 9 च्या सुमारास कामरगावातील बसस्टॅण्डवर थांबल्या होत्या. त्यावेळी निळ्या रंगाच्या दुचाकीवर आलेल्या इसमाने त्यांना आपल्याला भाळवणी येथे जायचे असल्याचे सांगून दहा मिनिटे गप्पा मारल्या. बोलण्याच्या नादात त्याने कातोरे यांच्या गळयातील सोन्याचे 12 ग्रॅम वजनाचे गंठण गायब लांबविले. त्यानंतर कातोरे यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
दुसर्या घटनेत जखणगाव येथील लता सूर्यकांत कार्ले व त्यांची सवत विजाबाई या लग्नाला जाण्यासाठी जखणगाव बसस्टॅण्डवर थांबल्या होत्या. यावेळी दुचाकीवर आलेल्या इसमाने त्यांना बस येणार नाही, मी तुम्हाला नगरला सोडतो, असे सांगितले. या दोघी त्याच्या दुचाकीवर बसल्या. नेप्ती शिवारात आल्यावर त्याने विजाबाई यांना गाडीवरुन खाली उतरविले आणि लता यांना पुढे नेऊन सांगितले की, मी तुमच्या मुलाचा मित्र आहे. तुमचे पीक विम्याचे पैसे बँकेत आलेले आहेत व त्यासाठी आधी तुम्हाला काही पैसे द्यावे लागतील. त्यावेळी लता यांनी त्याला आपल्याजवळ पैसे नसल्याचे सांगितले. त्यावर त्याने तुमच्या गळ्यातील सोन्याचे गंठण द्या. मी ते बँकेत गहाण ठेवून तुम्हाला पैसे काढून देतो. त्यावर लता यांनी त्याला गळ्यातील 10 ग्रॅम वजनाचे 120 सोन्याचे मणी असलेले गंठण काढून दिले. परंतु, तो परत आलाच नाही. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी पोलिसांत फिर्याद दिली.
नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक शिशीरकुमार देशमुख यांनी दोन्ही घटनांच्या तपासाबाबत रणजित मारग, युवराज चव्हाण, नितीन शिंदे, गायत्री धनवडे, कमलेश पाथरूट, संदीप जाधव, बांगर, घोरपडे यांचे पथक तयार आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. दोन्ही गुन्ह्यातील आरोपी हा एकच असून, तो सध्या कामरगावच्या बस स्टॅण्डवर थांबला असल्याचे सहायक निरीक्षक देशमुख यांना समजले. त्यांनी पथकाला सूचना देत त्याला तत्काळ जाऊन ताब्यात घेण्यास सांगितले. पथकाने सापळा लावून आरोपीस ताब्यात घेतले.