

कर्जत : पुढारी वृत्तसेवा : 'तू मला आवडतेस, मला फोन कर' असं तो युवक म्हटला अन् तुरुंगामध्ये जाऊन बसला. ही घटना कर्जत तालुक्यात घडली आहे. पोलिसांनी दिलेला हा 'जोर का झटका' युवतींसाठी दिलासा देणारा, तर रोडरोमिओंना ताळ्यावर आणणारा ठरणार आहे. याबाबत अधिक माहिती अशी, प्राजक्ता (बदललेले नाव) ही कर्जत येथील एका शाळेत शिकत असून, ती शिक्षणासाठी रोज घरापासून शाळेपर्यंत एसटी बसने येते. दि.8 रोजी ती नेहमीप्रमाणे शाळेत आली होती.
दुपारी 4 वाजता शाळा सुटल्यानंतर ती घराकडे येण्यासाठी बसस्थानकावर येऊन थांबली होती.त्यावेळी बसस्थानकात थांबलेला व अंगात निळा शर्ट व जीन्स पॅन्ट असलेला अनोळखी मुलगा दुचाकी (एमएच 16 सीएस 2688) घेऊन प्राजक्ताच्या जवळ आला व त्याने तिच्याजवळ असलेली दप्तराची बॅग ओढून तिच्या हाताला पकडून चिठ्ठ्ी देण्याचा प्रयत्न केला. 'तू मला आवडतेस, मला फोन कर' असे बोलून अश्लील हावभाव करून तिला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन त्याने केले.
हा प्रकार घडत असताना शेजारी असलेल्या मुलामुलींनी गाडीचे व त्या मुलाचे फोटो काढले होते. हा प्रकार त्या ठिकाणी हजर असलेल्या विद्यार्थिनींनी कर्जत पोलिसांना कळविला. पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, कर्मचारी गोवर्धन कदम, मनोज लातूरकर, दीपक कोल्हे, ईश्वर माने यांनी तत्काळ बसस्थानक गाठले आणि विद्यार्थी, विद्यार्थिनींकडे विचारपूस केली. विद्यार्थ्यांनी काढलेल्या फोटोवरून पोलिसांनी त्या मुलाचा परिसरात शोध घेतला. पण, तो सापडला नाही.
घरी आल्यानंतर प्राजक्ताने सर्व प्रकार वडिलांना सांगितला. दरम्यान कर्जत पोलिसांनी मुलाचा व गाडीचा शोध घेतला असता, त्याचे नाव बाबा भास्कर भिसे (रा.हंडाळवाडी, ता.कर्जत) असल्याचे समजले. त्याला पोलिसांनी अटक करून आणले असून, किमान दोन महिने तरी तो जेलमध्ये राहील, असे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी सांगितले. घडलेल्या घटनेबाबत कर्जत पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक यादव यांच्या आदेशाने आरोपीला पोलिस अधिकारी भगवान शिरसाठ, अनंत सालगुडे, कर्मचारी गोवर्धन कदम, श्याम जाधव, मनोज लातूरकर, सुनील खैरे, ईश्वर माने, दीपक कोल्हे, ईश्वर नरोटे यांनी तात्काळ अटक करून रोडरोमियो व मुलींना त्रास देणार्यांना 'जोर का झटका' दिला आहे.
निर्भयपणे पोलिसांना कळवा : यादव
कोणी त्रास देत असल्यास मुलींनी निर्भयपणे कर्जत पोलिसांना कळवावे. अशांची अजिबात गय केली जाणार नाही. संबंधित तक्रारदाराचे नाव गुप्त ठेऊन कारवाई केली जाते. असे प्रकार घडताना कुणाच्या निदर्शनास आले तर, त्रास देणार्याची माहिती, तसेच शक्य असल्यास त्याचे व वाहनांचे फोटो पोलिसांना पाठवा, असे आवाहन पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले आहे.