कोळपेवाडी : विवाह नोंदणीसाठीही आता प्लॅनचा फंडा!

कोळपेवाडी : विवाह नोंदणीसाठीही आता प्लॅनचा फंडा!
Published on
Updated on

राजेंद्र जाधव

कोळपेवाडी : अनेक कंपन्या आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध प्लॅन सांगून आपल्या कंपनीचा व्यवसाय वाढवितात. असेच काहीसे प्रकार करुन, काही विवाह नोंदणी संस्था उपवर मुलांच्या पालकांना आपल्या प्लॅनमध्ये सहभागी करून घेत, 5 ते 25 हजार रुपयांपर्यंत कमाई करीत आहेत.

मुलींचे प्रमाण कमी असल्यामुळे प्रत्येक उपवर मुलांच्या पालकांच्या चिंता वाढल्या आहेत. रेतीवाला नवरा नको, म्हणणार्‍या मुलींची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे शेतकरी उपवर मुलांच्या पालकांनी अक्षरशः धास्ती घेतली आहे. त्यामुळे साहजिकच घर बसल्या विवाह कसा जमविता येईल, या प्रयत्नात सर्व पालक आहेत. याची माहिती विवाह नोंदणी संस्थांना असल्यामुळे त्यांनी नाव नोंदणीसह अनेक प्लॅन देखील तयार केले आहेत. या प्लॅनला सिल्व्हर, गोल्डन व प्लॅटीनम अशी गोंडस नावे दिली आहेत.

या प्लॅनमध्ये वधू-वराच्या पालकांपुढे अनेक पर्याय ठेवण्यात आले आहेत. ऑनलाईन व ऑफलाईन पर्याय उपलब्ध आहेत. यासाठी वेगवेगळी रक्कम आकारली जाते, हे विशेष! एवढ्या सर्व प्लॅनपैकी वधू-वरांच्या पालकांनी निवडलेल्या प्लॅननुसार विवाह जमतीलच, असे या विवाह नोंदणी संस्था चालक छातीठोकपणे सांगतात. ठराविक कालावधीत जर विवाह जमला नाही तर दिलेली रक्कम परत करण्याची ग्वाही देखील देतात. त्यामुळे हजारो उपवर मुलांचे पालक नाव नोंदणी करून हे प्लॅन घेतात.

यामध्ये बहुतांश उपवर मुले शेतकरी व खासगी नोकरी करणारे व वयाची तिशी, पस्तीशी ओलांडलेले आहेत. त्यामुळे दर आठवड्याला विवाह नोंदणी केंद्राकडे सातत्याने स्थळाबाबत विचारपूस करतात, मात्र या विवाह नोंदणी केंद्राकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. ज्या कारणांमुळे विवाह जमत नाही तिच कारणे विवाह नोंदणी संस्थांचे चालक सांगतात. त्यावेळी अशा अडचणी आहेत, म्हणूनच आम्ही आपल्याकडे नाव नोंदणी केली आणि पैसे भरले, असे शाब्दिक वाद होवून अनेक वेळा वादाचे प्रकार देखील घडतात.

नाव नोंदणी केलेले पालक दिलेल्या रकमेची मागणी करतात, मात्र त्यांना ती रक्कम परत मिळत नाही. त्यामुळे स्वतःच्याच नशिबाला दोष देण्यावाचून त्यांच्याकडे दुसरा पर्याय शिल्लक राहत नसल्याने वर पिता तोंड दाबून हे सर्व निमुटपणे सहन करीत असल्याचे वास्तव समोर येत आहे.

संभाषणाची भुरळ पाडून पालक जाळ्यात!
काही विवाह नोंदणी संस्था सामाजिक बांधिलकी समजून अगदी कमी पैशात विवाह जुळविण्याचे काम अगदी प्रामाणिकपणे करीत आहेत, पण अशा संस्था बोटावर मोजण्या एवढ्याच आहेत, मात्र जाहिरातबाजी व फोनवर पहिल्या वेळी चौकशी करताना सभ्य भाषेत केलेल्या संभाषणाची भुरळ पाडून उपवर मुलांचे पालक अलगदपणे अशा काही विवाह नोंदणी संस्थांच्या जाळ्यात अडकत आहेत.

राजकुमारीच्या आशेने देखाव्याला पडतात बळी!
मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या कमी असल्यामुळे अशा विवाह नोंदणी संस्थांचे मोठे पेव फुटले आहे. नातेवाईकांच्या मध्यस्थीने विवाह जुळविण्याची आपली पूर्वपार पद्धत, मात्र नातेवाईकांच्या मुला-मुलींच्या विवाह सोहळ्यात थांबवायला कुणाकडे वेळच नाही. त्यामुळे आपुलकीने विचारपूस नाही की, विचारांची देवाण- घेवाण होत नाही.

त्यामुळे कुणाच्या घरात मुलगा-मुलगी उपवर आहे, याची माहिती मिळत नसल्यामुळे विवाह जुळवताना येणार्‍या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे विवाह जुळविण्याचे नातेवाईकांचे काम काही प्रमाणात या विवाह नोंदणी संस्था करीत आहेत. त्यामुळे आपल्या चिरंजीवाला देखील एखादी राजकुमारी भेटेल, या आशेपोटी काही उपवर मुलांचे पालक विवाह नोंदणी संस्थाच्या देखाव्याला बळी पडत आहेत.
कांदा उत्पादक शेतकरी, व्यापार्‍यांना न्याय द्या

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news