अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : पारनेरचे आमदार पहिल्यांदाच विधानसभेवर निवडून आले आहेत. ते बालिश असून, सध्या त्यांचे बेताल वक्तव्य सुरू आहे. या वक्तव्यामुळे बहुदा त्यांना दुसर्यांदा निवडून यायचे नसावे, असा टोला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नाव न घेता आमदार नीलेश लंके यांना लगावला. शिर्डी येथे नव्याने सुरू होत असलेल्या अपर जिल्हाधिकारी कार्यालयाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होत असल्याची टीका त्यांनी केली.
जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रम झाल्यानंतर विखे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर उपस्थित होते.
आळंदी येथील वारकर्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. यामध्ये काही जखमी झाले. त्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा द्या, अशी मागणी आमदार लंके यांनी केली आहे. या मागणीकडे विखे पाटील यांचे लक्ष वेधण्यात आले असता ते म्हणाले, की प्रथमच आमदार झाल्यामुळे त्यांना अद्याप बरेच काही शिकायचे आहे. मात्र, त्यांचे बेताल वक्तव्य सुरू आहेत. ते थांबविले पाहिजे. परंतु तसे न करता ते सुरूच असल्यामुळे त्यांना आगामी निवडणुकीत निवडून यायचे नसावे असा टोला त्यांनी लगावला.