

पोहेगाव (नगर), पुढारी वृत्तसेवा: कोपरगाव तालुक्यातील हिंगणी येथे गोदावरी नदीवर बांधलेल्या कोल्हापूर टाईप बंधार्यावर रविवारी रात्री 10 वाजता बिबट्याचा मुक्त संचार आढळला. विशेष असे की, बिबट्याने मुर्शतपूरसह हिंगणी या दोन्ही गावांच्या मार्गावर बस्तान मांडले.
दरम्यान, बिबट्याच्या धास्तीने बंधार्यावरून कोपरगावहून येणारे दुचाकी स्वार बंधार्याच्या बाजूला थांबले होते. बिबट्याच्या मुक्त संचारामुळे या परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. मुर्शतपूरसह धारणगाव, हिंगणी, जेऊर पाटोदा, चांदगव्हाण आदी परिसरात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याची दहशत पसरली आहे. बिबट्याने अनेक शेतकर्यांच्या शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या व कुत्री फस्त केली.
बिबट्या ज्यांनी पाहिला नाही त्यांचा या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता, मात्र हिंगणी बंधार्यावरून टाटा मॅजिक गाडी घेऊन जाताना मुर्शतपूरचे रामभाऊ शिंदे यांना बिबट्या दिसला. प्रसंगावधान राखत त्यांनी बिबट्याचा पळताना व्हिडिओ बनविला. वन विभागाने बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी हिंगणी व मुर्शतपूर परिसरातील नागरिक करीत आहेत.