

बेलापूर; पुढारी वृत्तसेवा : बेलापूर बुद्रुक परिसरातील अवकाळी पाऊस व गारपीटीने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महसूल विभागाच्या अधिकार्यांना दिल्याची माहिती जि. प. सदस्य शरद नवले तसेच उपसरपंच अभिषेक खंडागळे व गावकरी पतसंस्थेचे चेअरमन साहेबराव वाबळे यांनी दिली. बेलापूर शिवारातील कुर्हे वस्ती, दिघी रोड, गोखलेवाडी, खंडागळे वस्ती, गायकवाड वस्ती परिसरास गारपीट व अवकाळी पावसाने तडाखा दिला.
यात गहू, कांदा, हरभरा, मका, द्राक्ष, टरबूज आदी पिकांचे नुकसान झाले. गारपीट व अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची जि. प. सदस्य शरद नवले, उपसरपंच अभिषेक खंडागळे, गावकरी पतसंस्थेचे चेअरमन साहेबराव वाबळे, महेश कुर्हे आदिंनी शेतकर्यांसह नुकसानग्रस्त शेतकरी रामेश्वर नागले, दत्ता साळुंके, अनिल वाबळे, श्रीहरी बारहाते, राहुल वाबळे आदींच्या शेतात जाऊन पाहणी केली.
शेतकर्यांच्या कांदा, गहू, मका, ऊस, द्राक्ष, डाळिंब, टरबूज आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागाची पहाणी झाल्यानंतर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क करून नुकसानीची माहिती देण्यात आली.
तसेच तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली. याची महसूल मंत्री विखे पाटील यांनी गांभिर्याने दखल घेऊन महसूल विभागाच्या अधिकार्यांना त्वरित पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. गावाचे लोकप्रतिनिधी तसेच महसूल मंत्र्यांनी तातडीने दखल घेतल्याबद्दल आपदग्रस्त शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले आहे.