नगर : अरे काप्या… काप्या… असा आवाज आला की मकर संक्रातीचा सण जवळ आल्याचे कळते. हाच आवाज कधी मुक्या प्राण्याच्या तर, कधी मनुष्याच्या गळ्याचा फास होतो, याचा विचार कोणीच करीत नाही. प्रत्यक्षात पतंग उडविण्याचा आनंद साध्या मांजाने घ्यावा, असे असतानाही मनपा व पोलिसांच्या नाकावर टिच्चून चायना, नायलॉन मांजाची खुलेआम विक्री सुरू आहे. त्यातून पक्षी, दुचाकीस्वार जखमी होत असल्याच्या घटना घडत आहेत. दुसरीकडे मनपा पथक कारवाईसाठी गेल्यानंतर दादा, काकाचा फोन येतो अन् पथक रिकाम्या हाताने माघारी फिरते, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.
मकर संक्रांतीच्या सणाला पतंग उडविण्याची मोठी क्रेझ शहरात पाहायला मिळते. मकरसंक्रांत हा पारंपरिक सण असला तरी, देशात तरुणांसह अबालवृद्धही पतंग उडविण्याचा आनंद घेतात. पतंग उडविण्यासाठी साधा दोरा वापरावा, असे सांगितले असले तरी प्रत्यक्षात गेल्या काही वर्षांपासून चायना मांजा, नायलॉन मांजा वापरला जात आहे. हिवाळ्यात नोव्हेंबरपासून पतंग उत्सवास सुरुवात होते. तो उत्सव मकर संक्रांतीपर्यंत म्हणजेच 14 किंवा 15 जानेवारीपर्यंत चालतो. या उत्सवात दुर्घटना घडून, गळा कापल्याने अनेकांना जीव गमवावा लागल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्याचबरोबर कावळे, वटवाघळे, घार, साळुंखी, चिमण्या तसेच इतर पक्षी या मांजाचे बळी ठरत आहेत.
विशेष म्हणजे पतंगांच्या कापाकापीनंतर कागदाचा होणारा कचरा व मांजा तसाच रस्त्यावर फेकला जातो. हाच कचरा नंतर रस्त्यावरील मोकाट जनावरे, पक्ष्यांच्या पायात व तोंडात अडकतो. त्यात ते जखमी होतात. काही पक्षीमित्रांच्या म्हणण्यानुसार असा मांजा तार, केबल, झाडे व खांबांना अडकतो. याच मांजात उडणारे पक्षी अडकून जखमी होतात. दरवर्षी सरासरी 80 पक्षी जखमी होतात, तर 20 पेक्षा अधिक पक्ष्यांचा मांज्यात अडकून तडफडून मृत्यूही झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार नायलॉन मांजा व चिनी मांजावर कायद्यानुसार बंदी आहे. तरी देखील छुप्या मार्गाने नगर शहरात मांजाची विक्री होत आहे.
मकरसंक्रातीचा सण जवळ आल्याने चायना मांजावर बंदी असतानाही त्याची सर्रास विक्री केली जाते. मांजा ऑनलाईन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरही उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक अपघातांना सामोरे जावे लागत आहे. रोज किमान 4-5 घटना घडत आहेत. त्यामुळे चायना मांजा विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी जाणीव फाउंडेशने पोलिस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली. यावेळी महेंद्र नांदुरकर, प्रदीप वाखुरे, अॅड. विक्रम वाडेकर, राहुल जोशी, कैलाश दिघे, विकास गायकवाड, सतीश शिंदे उपस्थित होते.
महापालिकेकडून चायना मांजा विक्री करणार्यांना रान मोकळे करून देण्यात आले आहे. तर, दुसरीकडे एलसीबीकडून मोठ्या प्रमाणावर चायना मांजा जप्त केला जात आहे. कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 68 हजार 600 रूपयांचा नायलॉन मांजा जप्त केला. प्रथमेश राजू करपे (रा. वरवंडे गल्ली, माळीवाडा), चेतन कन्हैया चिपोळे (रा. जुना बाजार, हमालवाडा),जावेद कासम शेख (रा. माळीगल्ली, केडगाव) या तिघांवर कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महापालिकेच्या पथकाला मांजा सापडत नाही आणि पोलिस मांजा जप्त करीत आहेत. म्हणजे मांजा विक्रेत्यांवर प्रशासनाचा वचक राहिला नसल्याचे दिसून येते. मांजा विक्रेत्यांना माणुसकी राहिलेली नाही. त्यांना मासणापेक्षा पैसा महत्त्वाचा वाटतो. ही देश हितासाठी चुकीची गोष्ट आहे. मांजा कोणताही असो तो मनुष्य, पक्षी व प्राण्यांसाठी घातक आहे.
– डॉ. अमोल बागूल, पक्षीमित्र
तक्रारींवर कारवाईचा नुसता फार्स
शहरात चायना मांजामुळे नागरिक जखमी झाल्याच्या घटना घडल्या. महापालिका आयुक्तांकडे याबाबत तक्रारही करण्यात आली. त्यांच्याकडून कारवाईचे आदेश दिले जातात. मात्र, ते आदेश फक्त कागदोपत्रीच राहतात. प्रत्यक्षात यासंदर्भात केंद्र व राज्याचे आदेश असतानाही मांजा उत्पादक, वितरण करणार्यांवर तसेच विक्री करणार्यांवर कारवाई होताना दिसत नाही.
मनपाचे अधिकारीच जखमी
संक्रांतीचा सण जवळ येऊ लागल्याने मुले पतंग उडविण्याचा आनंद घेऊ लागले आहेत. त्यात चायना मांजा व नायलॉन मांजाची सर्रास विक्री होत आहे. गेल्या आठ दिवसांपूर्वी महापालिकेचे प्रसिद्धी अधिकारी शशिकांत नजान दुचाकीवरून जात असताना चायना मांजात अकडले. त्यात त्यांच्या हाताला मोठ्या जखमा झाल्या. चायना मांजामुळे दररोज दुचाकीस्वार जखमी होत आहेत. दुचाकी चालविताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.