राहुरीत केवळ कोटींची बात, सापडेना विकास वाट !

राहुरीत केवळ कोटींची बात, सापडेना विकास वाट !
Published on
Updated on

राहुरी :  पुढारी वृत्तसेवा :  राहुरी शहर हद्दीमध्ये पालिकेचा कारभार प्रशासकाकडून हाकला जात आहे. रस्ते, स्वच्छता, पाणी, सांडपाण्याचे नियोजन या समस्यांबाबत राजकीय नेत्यांकडून कोट्यवधी रूपयांच्या निधीच्या बाता होत असताना राहुरी शहर अजूनही विकास कामांच्या वाटा शोधत असल्याचे चित्र दिसत आहे. राजकीय आरोप- प्रत्यारोपामध्ये प्रत्येकजण कोट्यवधी रूपयांचा विकास केल्याचे सांगत आहे, परंतु शहरातील जनतेचे प्रश्न अजूनही अंधांतरीच असल्याने पेटलेल्या राजकारणाने शहरातील विकास कामाला उजाळा येण्याची अपेक्षा लागली आहे. राहुरी शहर जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. पालिकेच्या माध्यमातून शहराच्या विकास कामांना उजाळा देण्याचा प्रयत्न सुरू आहे. नगरपालिकेवर आजपर्यंत तनपुरे गटानेच एकहाती सत्तेचा वरचष्मा राखला आहे. राहुरीत विधानसभेसह पंचायत समिती व तनपुरे कारखान्याबाबत नेहमीच सत्तांतर झाले, परंतु पालिकेमध्ये अजूनही तनपुरे गटाला सत्तेतून पायउतार करण्यात विरोधकांना यश आले नाही.

दरम्यान, मागील नगरपरिषदेच्या निवडणुकीतही राष्ट्रवादीच्या वतीने नगराध्यक्षपदावर प्राजक्त तनपुरे यांनी वर्णी लावताना सर्वाधिक नगरसेवक निवडून आणले. नगराध्यक्ष असतानाच तनपुरे यांना पालिका टू विधानसभा गाठण्याची संधी लाभली. केवळ आमदारच नवहे तर नामदार होत आ. तनपुरे यांनी सहा खात्यांचे राज्यमंत्री पद मिळविले. त्यामध्ये नगरविकास हे महत्वाचे खात पालिकेमध्ये सर्वाधिक भेडसावणारा पाणी योजनेचा प्रश्न संपुष्टात आणला. पाणी योजनेनंतर भुयार गटार व अंतर्गत रस्त्याचा प्रश्न संपूष्टात येईल, अशी अपेक्षा असताना राज्यात सत्तांतर झाले.

आ. तनपुरे यांच्याकडे मंत्री पद असताना कोठेही न दिसणारे विरोधी पक्षातील नेते अचानकपणे जागृत झाले. सत्तांतराने विरोधकांना उर्जा मिळाली. त्यातच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पा. यांना जिल्ह्याचे पालकमंत्री पद लाभताच माजी आ. शिवाजीराव कर्डिले हेसुद्धा अ‍ॅक्टीव्ह मोडवर आले. विखे-कर्डिले एकी करा म्हणत कार्यकर्त्यांनीही पालिकेत सत्तांतराचा आवाज काढला.  विरोधकांनी मोठा गाजावाजा करीत शहरातील भुयारी गटार योजना आम्ही मंजूर करून आणली सांगत तब्बल 132 कोटी रूपयांचा निधी मंजूर झाल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. रावसाहेब चाचा तनपुरे व त्यांच्या समर्थकांनी महसूल मंत्री विखे व खा. डॉ. सुजय विखे यांसह माजी आ. कर्डिले यांच्या माध्यमातून निधी मंजूर करण्यात यश मिळविल्याचे सांगत आ. तनपुरेंवर टीका केली.

आ. तनपुरे यांनीही पत्रकार परिषद घेत 132 कोटी रूपयांसाठी केलेल्या प्रयत्नांची जंत्रीच पत्रकारांपुढे मांडली. परिणामी दोन्ही बाजुने आरोप प्रत्यारोपाच्या फैर्‍या झडू लागल्या. तुमचे नगरसेवक आमचे अभिनंदन करीत असल्याचा खुलासाही दोन्ही गटांकडून झाला. दरम्यान, विकास कामांचा श्रेयवाद पेटल्याचे चित्र दिसत आहे.

श्रेयवाद हा नित्याचाच विषय ठरत आहे..!

राहुरीत एखादा मोठा निधी आला व त्यावरून श्रेयाची लढाई झाली नाही, असे कधीच घडले नाही. यापूर्वी प्रशासकीय इमारतीचा प्रश्न असो की नुकताच पाणी योजनेचा मार्गी लागलेला प्रश्न. प्रत्येक विकास कामात श्रेयवाद दिसत असताना भुयारी गटार योजनाही त्यास अपवाद ठरली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news