नगरच्या चौकाचौकात झळकणार थकबाकीदारांची नावे

nagar mnc
nagar mnc

नगर : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या थकबाकीदारांना शास्तीमध्ये 75 टक्के सूट देऊनही अवघे 10 कोटी वसूल झाले. अद्याप सुमारे दोनशे कोटींची थकबाकी आहे. त्यातील सर्वाधिक थकबाकी बड्या थकबाकीदारांकडे आहे. आता त्या बड्या थकबाकीदारांची नावे मोठ्या फलकावर शहरातील चौकाचौकात झळकणार आहेत. तसे आदेश आयुक्तांनी वसुली विभागाला दिले आहेत. महापालिकेच्या तिजोरीत वर्षानुवर्षे खडखडाट आहे. महापालिकेची घरपट्टी, पाणीपट्टी अशा कराच्या स्वरूपात मालमत्ताधारकांकडे सुमारे 210 कोटी रुपयांची थकबाकी आहे. थकबाकी वसुलीसाठी पथके नेमूनही मालमत्ताधारकांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी मालमत्ताधारकांना सुरुवातीला 30 नोव्हेंबर ते 9 डिसेंबरपर्यंत 75 टक्के शास्तीमाफी जाहीर केली होती. दहा दिवसांत या योजनेचा 4 हजार 413 जणांनी लाभ घेत थकबाकीपोटी मनपाकडे 6 कोटी 70 लाख रुपयांचा भरणा केला. त्यानंतर शास्तीमाफीच्या योजनेत 31 डिसेंबरपर्यंत वाढ केली. उर्वरित 21 दिवसांत 3 कोटी 17 लाख 24 हजार अशी एकूण 9 कोटी 87 लाख 64 हजार रुपयांची वसुली झाली.

दरम्यान, शास्तीत 75 टक्के सूट देऊनही वसुलीचे प्रमाण अल्प राहिले. आजमितीला 2 हजार 734 मालमत्ताधारकांकडे एक लाखांपेक्षा जास्त थकबाकीदार आहेत. त्याच्याकडे 108 कोटी 91 लाख 78 हजार 794 रुपयांची थकबाकी आहे. त्यात मोठे उद्योजक, व्यावसायिक, हॉटेल चालक यांचा समावेश आहे. त्यातील काही मालमत्ताधारकांनी थकबाकी पोटी 2239 धनादेश मनपाला दिले. मात्र, ते सर्व धनादेश बाउंस झाले. आता बड्या थकबाकीदारांना चपराक देण्यासाठी महापालिकेने बेवसाईट व चौका-चौकात नामफलक जाऊन नावे जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे.

कर संकलनासाठी प्रभाग समितीला उपायुक्त
शास्तीत सूट देऊनही थकबाकीदार महापालिकेकडे भरणा करीत नाहीत. कर संकलनाची जबाबदारी एका उपायुक्तावर होती. आता महापालिकेत प्रशासक राज असून, आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी प्रशासकाचा पदभार घेतला आहे. कर संकलनाच्या कामात सुसूत्रता यावी यासाठी आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी प्रत्येक समितीला एका उपायुक्ताची नियुक्ती केली आहे. आता त्यांच्यावर करसंकलनाची जबाबदारी देण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news