

नगर, पुढारी वृत्तसेवा: जिल्हा परिषदेत मनुष्यबळाची कमतरता असतानाच विभागप्रमुखांचीही पदे रिक्त आहेत. त्यामुळे याचा प्रशासकीय कामकाजावर परिणाम पहायला मिळत आहे. ग्रामपंचायत आणि पाणीपुरवठा व स्वच्छता विभागात 'प्रभारीराज' असल्याने फायली टेबलवरच धुळखात पडून असल्याची कुजबूज आता कर्मचारीच करू लागल्याचे कानावर येऊ लागले आहे. त्यामुळे या रिक्त पदांवर नेमणुका कधी होणार, याकडे लक्ष असणार आहे.
जिल्हा परिषदेत सामान्य प्रशासन विभागात उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून राहुल शेळके यांची नेमणूक झालेली आहे. त्याचवेळी ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश शिंदे हे सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्याकडील ग्रामपंचायत आणि स्वच्छता व जलजीवनचे प्रकल्प संचालकांचा पदभार हा शेळके यांच्याकडे देण्यात आला आहे. त्यामुळे शेळके यांच्याकडे आता तीन विभागांचा पदभार आहे. त्याचा कामकाजावरही परिणाम पहायला मिळत आहे. ग्रामपंचायत विभागात अनेक फायली पडून असल्याची चर्चा आहे. याशिवाय स्वच्छता विभागाकडेही त्यांना लक्ष देण्यास पुरेसा वेळ मिळत नसल्याचे बोलले जाते. त्याचा प्रशासकीय कामकाजावर परिणाम पहायला मिळत आहे. याशिवाय पाणीपुरवठा या विभागात कार्यकारी अभियंता हे पद प्रभारी आहे. समाजकल्याण अधिकारी हे पदही प्रभारी आहे. मनरेगालाही तीच परिस्थिती आहे. त्यामुळे शासन स्तरावरून मिनी मंत्रालयातील विभागप्रमुखांची रिक्त पदे भरण्यासाठी प्रशासकीय व राजकीय पाठपुरावा करावा, अशी मागणी सामाजिक संघटनांमधूनही केली जाऊ लागली आहे.