अहमदनगर जिल्ह्यात 23 कृषी सेवा केंद्रांना नोटिसा

अहमदनगर जिल्ह्यात 23 कृषी सेवा केंद्रांना नोटिसा

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : खरीप हंगाम तोंडावर आलेला आहे. शेतकर्‍यांना गुणवत्तापूर्ण व योग्य दरामध्ये सर्व बियाणे, खते व कीटकनाशके उपलब्ध व्हावीत, यादृष्टीने भरारी पथके कृषी सेवा केंद्रांची तपासणी करत आहेत. यामध्ये त्रुटी आढळलेल्या 23 कृषी सेवा केंद्रांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. दरम्यान, आठ दिवसांत त्रुटींची पूर्तता न केल्यास शासनाकडे कारवाईचा प्रस्ताव पाठविला जाणार असल्याचे सूत्रांकडून समजले.

यंदाच्या खरीप हंगामाच्या तयारीसाठी विभागीय कृषी सहसंचालक नाईकवाडी, जिल्हा अधीक्षक बोराळे यांनी प्रशासनाला आवश्यक सूचना केल्या आहेत. त्यातूनच जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय भरारी पथके स्थापन करण्यात आलेली आहेत. जिल्ह्यातील सुमारे तीन हजार कृषी सेवा केंद्रांची भरारी पथकाकडून तपासणी करण्यात येत आहे. त्यामध्ये ज्या कृषी सेवा केंद्रामध्ये त्रुटी आढळून येत आहेत, त्यांना नोटिसा बजावल्या जात आहे.

खरोखरच, अशी तपासणी होते का?

वितरक, उत्पादक व विक्रेते यांच्याशी संबधित प्रपत्र एक-दोन, रासायनिक खते व किटकनाशके याबाबत उगम प्रमाणपत्र तपासणीवेळी त्रुटी आढळल्यास विक्रीबंद आदेश बजावण्यात येणार आहेत. मुदतबाह्य निविष्ठांचा शोध घेऊन त्याची विक्री होऊ नये यासाठी सूचना करणे, इनव्हाईस बिल, विक्रीसाठा याचा ताळमेळ घेऊन तफावत दिसल्यास तत्काळ कारवाई करणे, वितरकाने विक्रीसाठी प्रत्येक बियाण्याच्या लॉटचा किमान एक नमुना ठेवल्याची खात्री करणे, बोगस बियाणे, अनधिकृत साठा यासंदर्भात जप्तीची कारवाई, बनावट, विनापरवाना,अनाधिकृत बीटी तसेच अधिसूचित नसलेले खते आढळल्यास तत्काळ पोलिस केस करणे, जादा दराने विक्री अथवा लिंकिंग विक्री संदर्भात डमी ग्राहक पाठवून कारवाई करणे, शेतकर्‍यांना विहीत नमुन्यात बिले दिली जातात का, त्यावर शेतकर्‍यांची स्वाक्षरी घेतली जाते का, याची पडताळणी, पॉस मशिनवरील खतसाठा व भौतिक खतसाठा याची तपासणी, इत्यादी करण्याच्या सूचना आहेत. भरारी पथकातील निरीक्षकांनी वरील मुद्द्यांवर आणखी बारकाईने पडताळणी केल्यास जिल्ह्यातही मोठा काळाबाजार उघड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

बोगस बियाणे आढळल्यास तक्रारी करा

दर वर्षी खरीप हंगामात काही भागात कपाशीचे बोगस बियाणे विक्री करण्याचा प्रकार सुरू असतो. हे बियाणे कृषी केंद्रात मिळत नाहीत, मात्र थेट शेतकर्‍यांची दिशाभूल करून त्याची विक्री करणारी एक यंत्रणा कार्यरत आहे. अशाप्रकारे कुठे बियाणे विक्री होत असेल, तर तत्काळ कृषी विभागाशी संपर्क करा, असे आवाहन जिल्हा परिषद कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहेत.

कपाशीचे बियाणे 1 जूननंतरच मिळणार

कृषी संचालकांनी मान्सूनचे आगमन व हवामान आधारावर दिलेल्या सूचनानुंसार, यंदा कपाशीचे बियाणे हे वितरकांना 10 मे 2023 पर्यंत पोहोच होईल, त्यानंतर 15 मे नंतर वितरकाकडून किरकोळ विक्रेत्यांना ते पोहोच केले जाईल. मात्र 1 जूननंतरच ते शेतकर्‍यांना विकले जावे, त्यानंतर लागवडीसाठी पोषक वातावरण असेल, असे निर्देश कृषी विभागाला देण्यात आलेले आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news