

नगर : पुढारी वृत्तसेवा : शहरात दिवसेंदिवस खासगी व मनपाच्या मालकीच्या क्षेत्रावर अतिक्रमण वाढले आहे. शहरातील कर बुडविणार्या मालमत्ता व त्यावर असणारे विनापरवाना पत्रा शेडने शहराच्या विद्रुपीकरणामध्ये भर घातली आहे. शहरात खासगी व महापालिकेच्या जागेवर सुमारे एक हजार अनधिकृत पत्राशेड उभारले असून, तिथे दुकाने थाटली आहेत. त्या अतिक्रमण धारकांना वारंवार नोटिसा देऊनही अतिक्रमण निघत नाही. मग, अतिक्रमण विभाग कधी कारवाई करणार, असा प्रश्न नगरकरांना पडला आहे.
महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या महासभेमध्ये नगररचना विभागाने शहराचा सुधारित विकास आराखडा मांडला.
मात्र, त्यावर विचारविनिमय करण्यास वेळ मिळावा, म्हणून तो विषय नामंजूर करण्यात आला. असे असताना दुसरीकडे शहरात महापालिका व खासगी जागेवर विनापरवाना पत्राशेड उभारून त्या जागी दुकाने थाटण्यात आली आहेत. आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अतिक्रमण प्रतिबंधक विभागाकडून शहरातील सर्व कामकाजाचा आढावा घेतला. त्यात शहरातील रस्त्यावर, मनपाच्या जागेवर आणि खासगी मालकीच्या जागेवर विना परवाना पत्राशेड उभारून अतिक्रमण केल्याचे स्पष्ट झाले. अनधिकृत पत्रा शेड उभारल्याने महापालिकेचा कोट्यवधींचा कर बुडला आहे. कारण त्यातील एकाही पत्राशेड धारकाने मनपाकडून अधिकृत परवानगी घेतलेली नाही.
अतिक्रमण प्रतिबंधक विभागाने दिलेल्या अहवालामध्ये शहरात केडगाव, बोल्हेगाव, मुख्य शहर, सावेडी या भागामध्ये 957 अनधिकृत पत्र शेड उभे करण्यात आले असून, तिथे विविध व्यवसाय सुरू करण्यात आले आहेत. त्या पत्राशेडमुळे मोठे रस्ते अरुंद झाले आहेत. नागरिकांना येण्या-जाण्यासाठी रस्ता राहिला नाही. पत्राशेड उभे करून अनेकांनी भाड्याने दिले आहेत. त्यामुळे नेमके अतिक्रमण कोणी केले, याचा शोध मनपा घेत आहे. पत्राशेड दुकानदारांमुळे वाहतूक कोंडी नित्याचीच बनली आहे. विनापरवाना पत्राशेड धारकांना मनपाने वारंवार नोटिसा देऊन त्यांची कोणीही दखल घेतलेले नाही. दरम्यान, आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी संबंधित अधिकार्यांकडून अतिक्रमणाबाबतचा अहवाल मागवून घेतला आहे. त्यात आता पावसाळा आणि सण उत्सवही संपले आहेत. मग, आता त्या पत्राशेड धारकांवर कधी कारवाई होणार, असा प्रश्न नगरकरांना पडला आहे.
शहरात सावेडी, बोल्हेगाव, केडगाव, मुकुंदनगर या भागात मनपाच्या व खासगी जागेत अनधिकृत पत्राशेड उभारण्यात आले आहेत. त्यामुळे त्या परिसरात वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. किरकोळ दुकानदार याबाबत नगरसेवकांकडे तक्रारी करतात. पण, पत्राशेडधारक दुकानदार आपलाच कार्यकर्ता असल्याने कोणाला काय बोलणार, असा प्रश्नही नगरसेवकांना पडला आहे.
सावेडी, बोल्हेगाव, मुख्य नगर शहर या भागात मोठ्या प्रमाणात पत्राशेड दुकाने सुरू झाली आहेत. चौकाचौकात दुकाने सुरू झाल्याने अपघाताचे प्रमाण वाढले असून, वाहतूक कोंडी नित्याचीच बनली आहे. शहरात पहिलीच रस्त्यांची रूंदी कमी आहे आणि त्यात आता ही अनधिकृत दुकाने सुरू झाल्याने शहराच्या विद्रुपीकरणामध्ये भर पडली, असा सूर नागरिकांमधून निघत आहेत.
महापालिका हद्दीतील सावेडी, बोल्हेगाव, केडगाव उपनगरातील अनधिकृत पत्राशेडचे सर्वेक्षण केले आहे. त्याचा सविस्तर अहवाल आयुक्तांना दिला आहे. लवकरच तातडीने अनधिकृत पत्राशेडचे अतिक्रमण हटविण्याची मोहीम हाती घेतली जाणार आहे.
– आर. जी. सातपुते, अतिक्रमणविरोधी पथकप्रमुख, मनपा.