

नगर तालुका; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील जेऊर गावचे ग्रामदैवत देवी बायजामाता यात्रोत्सवा दरम्यान रविवारी झालेल्या दंगलप्रकरणी नऊ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या दंगलीने गावातील वातावरण तणावपूर्ण बनले असून, भीतीपोटी सोमवारी सर्वच व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवल्याने गावात शुकशुकाट दिसून आला. पोलिसांनी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
बायजामाता यात्रोत्सवाच्या शेवटच्या दिवशी दोन समाजाच्या गटांमध्ये झालेल्या दगडफेकीत खेळणी दुकानदार महिला व काही ग्रामस्थ जखमी झाले आहेत. जखमींमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. अचानक झालेल्या दगडफेकीमुळे यात्रेकरूंची मोठी धांदल उडाली. महिला, बालके, वृद्ध सैरावैरा धावत होते. दगडफेकीचा सर्वात जास्त फटका खेळणी दुकानदारांना बसला. त्यांचे मोठे नुकसान झाले. तसेच, महिला मोठ्या प्रमाणात जखमी झाल्या. खेळणी दुकानदारांची आपल्या गावी परतण्यासाठी मोठी धडपड सुरू होती.
सदर प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात पोलिस नाईक दीपक गांगर्डे यांच्या फिर्यादीवरून इद्रीस मुनीर शेख, मन्नू अलीम कुरेशी, अजिज रफीक शेख, हर्षद बागवान, साहिल बागवान, मुनीर खैरू शेख, शेख मुस्ताक, युनूस शेख, मुसा शेख, फइस रफिक शेख, अतुल उर्फ सोमनाथ सुखदेव तवले, सुनील दारकुंडे, गणेश दारकुंडे, दीपक शिंदे यांच्यासह इतर शंभर ते दीडशे लोकांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यातील नऊ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
रहाटगाडग्याजवळ पाळण्यामध्ये बसण्याच्या कारणावरून दोन गटात वाद झाला. त्यानंतर एका भागातील मुले दगड उचलून इतर मुलांच्या मागे पळाले. यावेळी फिर्यादी व साक्षीदार यांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी तेथून पलायन केले. त्यानंतर दोन्ही बाजूंनी दगडफेक सुरू झाली. त्यावेळी फिर्यादी यांनाही दगड मारून धक्काबुक्की करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
जेऊरमध्ये घडलेल्या प्रकारानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, उपअधीक्षक अजित पाटील, एमआयडीसीचे सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप हे मोठ्या फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले होते. सद्यस्थितीत गावात तणावपूर्ण वातावरण असून, मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जेऊर गावाला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
जेऊरमधील सर्व ग्रामस्थांनी कायदा व सुव्यवस्थेचे पालन करून शांतता राखावी. अफवांवर विश्वास ठेवू नये. सोशल मीडियावर तणाव निर्माण होईल, असे संदेश प्रसारित करू नयेत. अन्यथा कोणाचीही गय केली जाणार नाही, असे सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी म्हटले आहे.
बायजामाता टेकडी परिसरात हनुमान चौथरा येथे करण्यात आलेल्या अतिक्रमणावरून जेऊर गावात दोन महिन्यांपासून अंतर्गत धुसफूस सुरू होती. सदर अतिक्रमण हा कळीचा मुद्दा ठरत असून, दंगलीला 'त्या' अतिक्रमणाचीच किनार असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू आहे.