

निमगाव खैरी येथे चौघा जणांना मारहाण करत चॉपरने व तलवारीने वार करत जबर जखमी केल्याची घटना काल घडली. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निमगाव खैरी येथील पुरुषोत्तम भागडे, संतोष भागडे, सर्जेराव भागडे, ध्रुव भागडे असे चौघेजण जखमी झाले आहेत. पुरुषोत्तम भागडे हे वस्तीवरुन मोटारसायकलवरून बल्ब घेण्यासाठी खैरी गावात सुमीत इलेक्ट्रीकल या दुकानासमोर गाडी लावुन दुकानात गेले होते.
त्या दरम्यान एक बिगर नंबरच्या लाल रंगाच्या स्वीप्ट कारने उभ्या असलेल्या मोटारसायकलला धडक दिली. पुरुषोत्तम भागडे याने गाडीजवळ जावुन गाडी व्यवस्थीत चालवत जा, असे सांगितले, याचा राग आला. गावातील प्रसाद भाऊसाहेब वदक, वाघुजी नानासाहेब शिंदे, दीपक बाळासाहेब तुपे हे तिघे मोटारसायकल जवळ येवून त्यातील प्रसाद याने पुरुषोत्तम भागडे यांच्या तोंडात मारली, तेव्हा त्यांचे सोबत असलेला चुलत भाऊ संतोष भागडे मध्ये आला. त्यास दीपक तुपे, वाघुजी शिंदे यांनी मारहाण केली व प्रसादने चॉपरने सपासप वार केले. वाघुजी शिंदे याने त्याच्या हातातील तलवार पुरुषोत्तमच्या डोक्यावर मारली.
पुरुषोत्तम हा त्यांच्या तावडीतून निसटला व शेजारी असलेल्या आरोग्य केंद्रात आश्रय घेतला. त्यावेळेस तिथे ध्रुव भागडे आले, ते काही विचारायच्या आतच प्रसाद वदक याने त्याच्या हातातील चॉपरने पोटात वार केले. वाघुजी शिंदे याने पुन्हा धरुन ठेवले व चुलते सर्जेराव भागडे तेथे आले तेव्हा त्यांनाही दीपक तुपे याने शिंदेच्या हातातील तलवार घेवुन त्यांच्या हातावर मारली. त्यावेळेस हे सर्व जखमी होवून रक्तबंबाळ झालेले असताना प्रसाद वदक याने तिथे असलेल्या लोकांना तलवार फिरवुन तुमच्या पैकी पोलिसांना फोन केला तर त्याचेसुदधा हेच हाल होतील, असे म्हणुन वाहनातून निघुन गेल्याचे फिर्यादीत म्हटले. नगर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये जखमींवर उपचार सुरू आहेत.
श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यात पुरुषोत्तम रामदास भागडे यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी प्रसाद भाऊसाहेब वदक, वाघुजी नानासाहेब शिंदे, दीपक बाळासाहेब तुपे यांचेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.