नीलेश लंकेंच्या विजयाचा फ्लेक्स पाथर्डीत जप्त

नीलेश लंकेंच्या विजयाचा फ्लेक्स पाथर्डीत जप्त

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील लोकसभा निवडणूक आचारसंहिता कक्षाने एका राजकीय पक्षाचा लावलेला फ्लेक्स बोर्ड शहरातून जप्त करून ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यासाठी हालचाली सुरू होत्या. या संदर्भात अधिक माहिती अशी की, नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडणूक लढवणारे नीलेश लंके हे खासदार म्हणून निवडून आल्याबद्दल त्यांच्या एका समर्थकाने शुभेच्छांचा फ्लेक्स बोर्ड शहरातील नाईक चौक व जुन्या बसस्थानक परिसरात नगर रोडवर दोन ठिकाणी लावला होता.

गुरुवारी दुपारी शेवगाव येथील निवडणूक भरारी पथक (क्र.1) यांनी शहरात येऊन हे दोन फलक काढून घेत पोलिस स्टेशनच्या ताब्यात दिले आहेत. शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील आचासंहिता कक्षप्रमुख राजेश कदम यांच्या पथकातील नीलेश झिरपे, पोलिस उपनिरीक्षक अमोल पवार यांच्यासह पाथर्डी नगरपरिषदेचे दत्तात्रय ढवळे, शिवा पवार यांच्या पथकाने लावलेले दोन मोठे फ्लेक्स बोर्ड काढून घेतले आहे. या प्रकरणी आता निवडणूक आयोग काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

समर्थकांत विजयाचे दावे-प्रतिदावे सुरू

लोकसभा निवडणुकीतील मतमोजणीपूर्वीच लंके यांच्या एका समर्थकाने मागील तीन दिवसांपूर्वी शहरातील मुख्य दोन ठिकाणी नीलेश लंके खासदारपदी निवडून आल्याबद्दल मोठे फलक लावले होते. हे फलक सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते. या फलकांमुळे लंके आणि विखे या समर्थकांमध्ये चांगली चर्चा रंगून दावे-प्रतिदावे सुरू होते.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news